प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी; विक्रेत्यांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी.
प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी; विक्रेत्यांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी.
कोल्हापूर, दि. — करवीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंदी असलेली प्लास्टिक फुले बाजारात विक्रीस उपलब्ध होत असून त्यामुळे स्थानिक फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याची बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टिक फुले विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक फुलांची शेती केली जाते. मात्र, सध्या बाजारात प्लास्टिक फुलांची वाढती विक्री ही शेतकऱ्यांसाठी गंभीर समस्या ठरत आहे. खरी व कृत्रिम फुले ओळखणे कठीण होत असल्याने ग्राहकांकडूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक फुलांची खरेदी होत आहे. लग्न समारंभ, सजावट तसेच सणासुदीच्या काळात या फुलांचा वापर वाढत असल्याने पर्यावरणावरही दुष्परिणाम होत आहेत.
तज्ञांच्या मते, विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो तसेच आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकतात. याशिवाय, बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि फुले अजूनही बाजारात सहज उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायत स्तरावर कोणत्या वस्तूंवर बंदी आहे याची पुरेशी माहिती नसल्यामुळे कारवाई होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंवर कडक कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, गुजरातसह अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या ट्रान्सपोर्टद्वारे गांधीनगर बाजारपेठेत येत असून तेथून इतर भागात त्याचा पुरवठा होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भातील निवेदन जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना देण्यात आले. यावेळी संबंधित ग्रामपंचायतींना आदेश देऊन त्यांच्या स्तरावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, फेरीवाला संघटनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवासेना सचिव सचिन नागटिळक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

No comments: