Header Ads

डॉक्टर सेल्फीत ‘बिझी’, रुग्ण मात्र रांगेत ‘हैराण’; सांगली सिव्हिलमधील धक्कादायक वास्तव! एक्स-रे समोर तासन्‌तास प्रतीक्षा; रुग्णांचा संताप उसळला, चौकशीची मागणी

 डॉक्टर सेल्फीत ‘बिझी’, रुग्ण मात्र रांगेत ‘हैराण’; सांगली सिव्हिलमधील धक्कादायक वास्तव!

एक्स-रे समोर तासन्‌तास प्रतीक्षा; रुग्णांचा संताप उसळला, चौकशीची मागणी.

------------------------

सांगली मिरज प्रतिनिधी 

राजू कदम 

------------------------

सांगली : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे आरोग्य सेवेलाच काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. एक्स-रे विभागासमोर रुग्णांची लांबलचक रांग लागलेली असताना काही डॉक्टर तब्बल दीड तास सेल्फी, फोटो आणि व्हिडिओ काढण्यात गुंग असल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण वेदनांनी कळवळत उभे असताना डॉक्टर मात्र मोबाईल कॅमेऱ्यात ‘पोज’ देण्यात व्यस्त होते. “उपचार मिळणार की नाही?” या चिंतेत असलेल्या रुग्णांना कोणीच दाद देत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

“हे हॉस्पिटल आहे की शूटिंग लोकेशन?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. “डॉक्टरांना जर सेल्फीच काढायचे असतील, तर रुग्णांनी कुणाकडे धाव घ्यायची?” अशी तीव्र प्रतिक्रिया रुग्ण व नातेवाईकांकडून उमटली.

या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सिव्हिल सर्जन आणि आरोग्य प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सांगलीतील आरोग्य व्यवस्थेवर जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.