थकीत पेन्शन तात्काळ द्या; करवीर शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
थकीत पेन्शन तात्काळ द्या; करवीर शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
-----------------
शशिकांत कुंभार
-------------------
कोल्हापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर तालुक्याच्या वतीने संजय गांधी व श्रावण बाळ शासकीय योजनांतील डिसेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत थकीत राहिलेली पेन्शन तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
जिल्ह्यात संजय गांधी योजनेचे सुमारे ६९ हजारांहून अधिक, तर श्रावण बाळ योजनेचे १ लाख २४ हजारांपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. मात्र, डीबीटी (थेट बँक खात्यात निधी जमा) प्रणाली लागू झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना आधार लिंकिंग व इतर प्रक्रियेमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. परिणामी ६० ते ७० टक्के लाभार्थी काही महिन्यांपासून पेन्शनपासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वयोवृद्ध, अपंग व विधवा लाभार्थ्यांना पेन्शन हीच उपजीविकेचा मुख्य आधार असून, गेल्या ७ ते ८ महिन्यांत प्रत्येकी सुमारे १० ते १२ हजार रुपयांचा लाभ थकित राहिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या काळात अनेकांना औषधोपचार व दैनंदिन खर्च भागवताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे राजू यादव यांनी सांगितले की, “पेन्शनवरच उदरनिर्वाह करणाऱ्या लाभार्थ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. थकीत रक्कम तात्काळ देऊन त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.”
या मागणीवर प्रशासनाकडून संबंधित विभागाकडून अहवाल मागवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी अवधूत साळोखे, रविभाऊ चौगुले यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments: