Header Ads

शाहूवाडी तालुक्यात आरोग्य व बांधकाम कामांचा आढावा; अपूर्ण पदे भरण्याची ग्वाही...

 शाहूवाडी तालुक्यात आरोग्य व बांधकाम कामांचा आढावा; अपूर्ण पदे भरण्याची ग्वाही...

------------------------------------

मलकापूर : प्रतिनिधी: रोहित पास्ते .

--------------------------------------


शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे व भेडसगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान आरोग्य केंद्रांतील सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळाची उपलब्धता तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी जाणवणाऱ्या त्रुटींवर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

यानंतर पंचायत समिती शाहूवाडीच्या सभागृहात आरोग्यविषयक तसेच बांधकाम विषयक आढावा बैठक पार पडली. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता, औषध व लसींचा पुरवठा, इमारतींची स्थिती तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत विशेष भर देण्यात आला.

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील,अमरसिंह पाटील,  स्नेहल वेल्हाळ, पंचायत समिती सभापती प्रियंका भोसले, पंचायत समिती सदस्य धनश्री रोडे पाटील, लक्ष्मी पाटील, सुरेश पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी मंगेश कुचेंवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी तसेच जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना सभापती सारिका नांदेकर यांनी आरोग्य विभागातील अपूर्ण कर्मचारी संख्या तातडीने भरण्याची ग्वाही दिली. “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे रिक्त पदे लवकरात लवकर भरून काढली जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच काही आरोग्य केंद्रांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने लसींचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले. “ज्या ठिकाणी लसींची कमतरता आहे, त्या ठिकाणी त्वरित उपलब्धता करून देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) असलेल्या सुविधा अभावाबाबतही त्यांनी गांभीर्याने दखल घेतली. आवश्यक उपकरणे, इमारत दुरुस्ती, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी लवकरच ठोस उपाययोजना राबवण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले. आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

या दौऱ्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या उन्नतीसाठी सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे

No comments:

Powered by Blogger.