टाळ-मृदुंगाच्या गजरात, 'राम कृष्ण हरी' म्हणत झाली नवरा - नवरीची एंट्री
टाळ-मृदुंगाच्या गजरात, 'राम कृष्ण हरी' म्हणत झाली नवरा - नवरीची एंट्री .
----------------------
करडवाडी प्रतिनिधी
स्वरूपा खतकर.
-------------------------
आजकाल विवाहसोहळ्यांचे स्वरूप झपाट्याने बदलताना दिसत आहे. विशेषतः लग्नापूर्वी नवरी डोलीतून आणि नवरा घोड्यावरून डीजेच्या तालावर नाचत मंडपात प्रवेश करणे हे नित्य नियमाचे असल्याचे आपण पहातो. मात्र आज नव्या पिढीने भक्तीचा मार्ग अवलंबताना दिसून आला. याचा आदर्श सर्वांनी घेतल्यास जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही.
आजरा तालुक्यातील साळगाव येथे झालेल्या लग्नात साधेपणाने, पारंपरिक रितीरिवाज आणि विशेषता नवरीच्या डोक्यावर तुळशीचे रोप देऊन राम कृष्ण हरी च्या जयघोषात नवरा - नवरीची एंट्री म्हणजे चर्चेला उधाण आले होते. लग्न समारंभात भव्यता, दिखावा आणि मनोरंजन याकडे झुकताना दिसत असताना या ठिकाणी काहीतरी वेगळे पहावयास मिळाले.
लग्न समारंभात डीजे आणि बँडच्या तालावर थिरकण्याची पद्धत मागे टाकत आजरा तालुक्यातील साळगाव येथे एका अनोख्या पद्धतीने नवरा -नवरीची एंट्री झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि 'राम कृष्ण हरी'च्या जयघोषात दिंडीसोबत नवरा - नवरीनी लग्न मंडपात प्रवेश केल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गुलाबी फेटा, पांढरा कुडता आणि जॅकेट या पारंपरिक वेशातील विद्यार्थिनी हातात टाळ घेऊन भजन म्हणत होत्या. त्यांच्यामागे पांढरे वस्त्र परिधान केलेले वारकरी मृदुंग आणि टाळ वाजवत होते. पारंपरिक दिंडीच्या वेशातच पालखी आणि नवरा - नवरीच्या डोक्यावर छत्र घेऊन ही वऱ्हाडी मंडळी येत होती.
सध्या लग्नात होणारा डीजे चा कर्कश आवाज आणि हुल्लडबाजी याला फाटा देत आयोजकांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा आणि भजन-कीर्तनाची परंपरा जपली. नवरीच्या एंट्रीला दिंडीचे स्वरूप दिल्याने लग्नाला एक प्रकारचे मांगल्य आणि पावित्र्य आले. उपस्थित वऱ्हाडी मंडळींनीही या अनोख्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
चौकट १.
ग्रामीण भागात लग्न समारंभाला आलेले नवे स्वरूप आता चर्चेचा विषय ठरत आहे. डीजे ऐवजी टाळ-मृदुंग आणि चित्रपट गाण्यांऐवजी अभंग व भजन यामुळे लग्न सोहळा भक्तिमय झाला. तरुण पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
सुनिल घेवडे
नवरदेव वडील
चौकट २.
एकंदरीत, बदलत्या काळानुसार लग्न समारंभाचे स्वरूप बदलणे स्वाभाविक असले तरी त्यामध्ये आपल्या संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधला तरच भारतीय विवाहसंस्कृतीची खरी ओळख टिकून राहील.
वसंत निऊंगरे
नवरी वडील

No comments: