Header Ads

कोतोली बस स्थानकावर स्वच्छतागृह नाही 25 गावांचा राबता, पण जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही.... ग्रामपंचायत व एसटी महामंडळ यांचे दुर्लक्ष... भाग-१

 कोतोली बस स्थानकावर स्वच्छतागृह नाही

25 गावांचा राबता, पण जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही....

ग्रामपंचायत व एसटी महामंडळ यांचे दुर्लक्ष...

भाग-१.

----------------------

माधुरी मस्कर, पन्हाळा

---------------------------

पन्हाळा तालुक्यातील कोतोली ही मोठी बाजारपेठ असून येथे दररोज शेकडो प्रवासी व भाजीपाला, फळे, इतर साहित्य विक्रीसाठी येणाऱ्या महिलांची मोठी वर्दळ असते. कोतोलीशी संबंध असणाऱ्या किमान 25 गावांतील लोकांचा राबता दररोज या स्टँडवर असल्याने आरोग्याशी थेट संबंध असणारा स्वच्छतागृहाचा प्रश्न कोण सोडवणार, हा यक्षप्रश्न नागरिकांपुढे आ वासून उभा आहे.


*मंगळवारचा आठवडा बाजार स्टँडवर नाही, तरी गर्दी तुफान*  

कोतोलीचा मंगळवारचा आठवडा बाजार स्टँडवर न भरता ग्रामपंचायत आवार व मेन रोडवर भरत असतो. मात्र त्या दिवशीही स्टँडवर प्रवाशांची व खरेदीदारांची प्रचंड गर्दी असते. इतर दिवशीही सकाळपासून भाजी विक्रीसाठी बसणाऱ्या महिला व प्रवाशांची कुचंबणा ठरलेलीच. नैसर्गिक विधीसाठीही वणवण करावी लागते. महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, पण सोयरसुतक कुणालाच नाही!


*मंत्री सरनाईकांची घोषणा, कोतोलीत मात्र ‘जैसे थे’*  

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 जून 2026 पासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कॅन्टीन चालकांवर कारवाईचे अधिकारही एसटी महामंडळाला दिले आहेत. मात्र कोतोलीसारख्या मोठ्या गावात स्वच्छतागृह तर सोडाच, साधे प्रवासी निवारा शेडदेखील एसटी महामंडळाने आजवर उपलब्ध करून दिलेले नाही. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य फक्त कागदावरच राहिले की काय?


*हद्द कुणाची? पण नैतिक जबाबदारी कोतोली ग्रामपंचायतीचीच*  

कोतोली बसस्थानकाची उत्तरेकडील बाजू ग्रामपंचायत कोतोलीच्या हद्दीत, तर दक्षिणेकडील बाजू ग्रामपंचायत माळवाडीच्या हद्दीत येते. त्यामुळे ‘हद्द कुणाची’ हा वाद कळीचा मुद्दा ठरू शकतो. परंतु बाजारपेठेतील बहुतांश व्यापारी गाळे व व्यवसाय कररूपाने जास्तीत जास्त उत्पन्न ग्रामपंचायत कोतोलीला मिळत असल्याने, येथे मूलभूत सुविधा पुरवण्याची नैतिक जबाबदारी कोतोली ग्रामपंचायत प्रशासनाचीच आहे. कर गोळा करताना हात पुढे, पण सोयी देताना मात्र पाठ का?


*‘जागा नाही’ हे मुळमुळीत उत्तर, पण इच्छाशक्ती कुठे?*  

अर्थात याबाबत एसटी महामंडळ आणि ग्रामपंचायत यांचे उत्तर ठराविक आणि ठरलेलेच असणार आहे - “स्वच्छतागृह बांधायला कोणतीही अडचण नाही, परंतु जागा उपलब्ध नाही.” हेच मुळमुळीत उत्तर वर्षानुवर्षे दिले जात आहे. परंतु महिलांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची भावना मनात असेल, लोकांच्या अडीअडचणी लक्षात येत असतील आणि पर्यायी मार्ग काढण्याची मानसिकता असेल, तर जागेचा प्रश्न नक्कीच सुटू शकतो. इच्छाशक्तीचा अभाव हेच खरे कारण नाही का?


*नेत्यांपर्यंत प्रश्न पोहोचतच नाही का?*  

पश्चिम पन्हाळा भागामध्ये प्रत्येक गावात आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना मानणारा गट सक्षम आहे. गावातील साध्या-साध्या गोष्टी नेत्यांच्या कानात जाऊन सांगणारे कार्यकर्ते गावोगावी आहेत. मग महिलांच्या आरोग्याशी निगडित हा ज्वलंत व जिव्हाळ्याचा प्रश्न आपल्या नेत्यांसमोर का बरं मांडला जात नाही? हा खरोखरच चिंतन करायला लावणारा प्रश्न आहे.


*‘तुम्ही करा’ची ढकलाढकली, जनता भरडली*  

ग्रामपंचायतीला जाग येणार की एसटी महामंडळाने हे काम करावे, यावरून सध्या ‘तुम्ही करा-आम्ही का करू’ अशी ढकलाढकली सुरू आहे. इकडे मात्र महिला, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक भर ऊन-पावसात किराणा दुकान, मेडिकल, केस कर्तनालयाच्या दारात उभे राहून एसटीची वाट पाहत आहेत. पावसाळ्यात लोकांचे होणारे हाल दिसत असूनही एसटी महामंडळाचे डोळे उघडेनात आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकाही पुढाऱ्याला याचे सोयरसुतक नाही, हीच मोठी शोकांतिका.


*उत्पन्न भरपूर, सुविधा शून्य*  

कोतोली विभागातून एसटी महामंडळाला दररोज हजारो रुपयांचे उत्पन्न मिळते. तरीही प्रवाशांसाठी किमान सुविधा देण्याचे भान एसटी महामंडळ विसरले आहे. 


*महिलांची आर्त हाक : आता तरी जागे व्हा!*  

“दररोज सकाळपासून भाजी विक्रीसाठी बसतो. स्वच्छतागृह नसल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. दाद मागायची कुणाकडे?” असा संतप्त सवाल महिला विक्रेत्या करत आहेत.

ग्रामपंचायत कोतोली, एसटी महामंडळ व लोकप्रतिनिधींनी आता तरी जागे होऊन बसस्थानक व बाजारपेठ परिसरात तातडीने स्वच्छतागृह व निवारा शेड उभारावे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांतून दिला जात आहे.

No comments:

Powered by Blogger.