Header Ads

.काळमवाडी धरण ‘नो-एंट्री’च्या उंबरठ्यावर! पर्यटकांवर कायमस्वरूपी बंदीचा निर्णय लवकरच. धोकादायक डोह ठरला जीवघेणा; ९–१० बळींनंतर प्रशासनाचा कठोर पवित्रा.

 काळमवाडी धरण ‘नो-एंट्री’च्या उंबरठ्यावर! पर्यटकांवर कायमस्वरूपी बंदीचा निर्णय लवकरच.

धोकादायक डोह ठरला जीवघेणा; ९–१० बळींनंतर प्रशासनाचा कठोर पवित्रा.

------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे :

------------------------------------

राधानगरी तालुक्यातील काळमवाडी धरण परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन मोठा आणि कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या संख्येने पर्यटक मौजमजा करण्यासाठी या धरण परिसरात येत असतात. मात्र धरणाजवळील खोल आणि धोकादायक डोहामुळे अनेकांना पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत ९ ते १० पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे.

वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेण्याचा इशारा दिला असून, लवकरच धरण परिसरात पर्यटकांना प्रवेश बंद करण्याबाबत आदेश जारी केला जाणार आहे. संबंधित विभागांकडून यासाठी कडक अंमलबजावणीची तयारी सुरू आहे.

‘फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र’ या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलशी बोलताना तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितले की,

“काळमवाडी धरण क्षेत्रात पर्यटनासाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार असून, याबाबतचा आदेश तात्काळ देण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला जात आहे.”

दरम्यान, या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता असली तरी, जीवितहानी रोखण्यासाठी प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

No comments:

Powered by Blogger.