जावलीतील सराईत गुन्हेगारावर हद्दपारी; सहा महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून बंदी.
जावलीतील सराईत गुन्हेगारावर हद्दपारी; सहा महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून बंदी.
----------------------------
सातारा जिल्हा | प्रतिनिधी
– अमर इंदलकर.
-----------------------------
मेढा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ओंकार विठ्ठल आगलावे (रा. बिभवी, ता. जावली, जि. सातारा) याला सहा महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शरीराविरुद्धचे गुन्हे, अपहरण तसेच अवैध दारू विक्रीसारख्या गंभीर प्रकरणांत त्याचा सहभाग आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीवर यापूर्वीही वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने आणि जावली तालुक्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या दारू विक्री सुरू ठेवल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी कडक पाऊल उचलले.
मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अंतर्गत आरोपीला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. प्रस्तावावरील सुनावणीनंतर आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची गंभीर दखल घेत त्यास सहा महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप उदागे, कॉन्स्टेबल सनी काळे व सचिन श्रीरामे यांनी सहभाग घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पथकाचे अभिनंदन केले आहे.

No comments: