शिरोली येथील नराधम आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मुरगूडमध्ये नागरिकांकडून निवेदन
शिरोली येथील नराधम आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मुरगूडमध्ये नागरिकांकडून निवेदन.
--------------------------
मुरगूड/ जोतीराम कुंभार.
----------------------------
मुरगूड येथील नागरिकांनी कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडत असलेल्या काही चिंताजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेबाबत पुढाकार घेत पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले. मुलींची फसवणूक, जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार, लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करण्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले.
या पार्श्वभूमीवर समाजातील महिलांची व तरुणींची सुरक्षा अबाधित राहावी तसेच अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी मुरगूड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देण्यात आले. नागरिकांनी मुरगूड परिसरात नियमित गस्त वाढवणे, संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवणे, महिलांच्या सुरक्षेसाठी जनजागृती मोहिमा राबवणे तसेच अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
तसेच नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी सुलभ व तत्पर व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशीही विनंती करण्यात आली. शिरोली येथे घडलेल्या घटनेचा संदर्भ देत दोषींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना देखील व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी स्वीकारले. यावेळी त्यांनी निवेदनकर्त्यांशी चर्चा करून महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
मुरगूड शहरातील नागरिकांनी एकत्र येत केलेल्या या उपक्रमामुळे परिसरात सुरक्षिततेबाबत सकारात्मक संदेश गेला असून, पोलीस प्रशासनानेही याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, व्हि. आर भोसले,शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, मोहिते सर, धनंजय सूर्यवंशी, मयूर सावर्डेकर, शिवाजी चौगले, संकेत शहा,आनंदा रामाने, प्रवीण लोहार, प्रकाश परिषवाड, सुभाष अनावाकर, अमोल मेटकर, प्रफुल कांबळे, अमर सुतार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

No comments: