सावत्र बापाच्या अमानुष कृत्याला न्यायालयाचा चाप; अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षांची सक्तमजुरी
सावत्र बापाच्या अमानुष कृत्याला न्यायालयाचा चाप; अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षांची सक्तमजुरी.
---------------------राधानगरी प्रतिनिधी :
विजय बकरे
----------------------
अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावत कठोर संदेश दिला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता बी. अग्रवाल यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय बंडू गोरे (वय ५३, रा. कत्यायनी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याने आपल्या सावत्र अल्पवयीन मुलीवर सन २०१३ पासून ते २७ जून २०१९ पर्यंत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.
पीडितेच्या असहाय्यतेचा व अल्पवयाचा गैरफायदा घेत आरोपीने “आईला ठार मारीन, जीव देईन, तुमची वाट लावीन” अशा धमक्या देत अत्याचार सुरू ठेवले होते. अखेर पीडितेने धैर्य दाखवत राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६, ५०४, ५०६ तसेच पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एस. लोखंडे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील अॅड. प्रतिभा जयकर जाधव यांनी सरकार पक्षातर्फे भक्कम बाजू मांडली. त्यांनी एकूण १४ साक्षीदार तपासून वरिष्ठ न्यायालयांचे दाखले व पुरावे न्यायालयासमोर सादर केले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३७६(३), ५०४, ५०६ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ६ व १२ अंतर्गत २० वर्षांची सक्तमजुरी व ३ हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास अतिरिक्त साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या खटल्यात पैरवी अधिकारी विक्रम पाटील (बक्कल नं. २४१२) तसेच तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता लायकर यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

No comments: