पेन्शनसाठी वृद्धांचे बँकांमध्ये हेलपाटे; करवीर शिवसेनेचा प्रशासनाला इशारा
पेन्शनसाठी वृद्धांचे बँकांमध्ये हेलपाटे; करवीर शिवसेनेचा प्रशासनाला इशारा
महिन्याच्या महिन्याला पेन्शन द्या, हयातीच्या दाखल्यासाठी वृद्धांची फरफट थांबवा.
------------------------------कोल्हापूर : संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, अपंग व विधवा महिला योजनेतील लाभार्थ्यांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पेन्शन मिळत नसल्याने जेष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप करत करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तहसील प्रशासनाला धारेवर धरले आहे. “शासनाकडे पैसे नसतील तर तसे जाहीर करावे; पण गोरगरिबांच्या औषधोपचारासाठी लागणारे पैसे अडवू नयेत,” असा संतप्त इशारा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला.
कोल्हापूर जिल्ह्यात संजय गांधी योजनेचे तब्बल ६९ हजार ८८३ तर श्रावणबाळ योजनेचे १ लाख २४ हजार ४७३ लाभार्थी आहेत. करवीर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात वृद्ध लाभार्थी असून पेन्शन वेळेवर जमा होत नसल्याने वृद्धांना कडक उन्हात बँकांचे हेलपाटे मारावे लागत आहेत. औषधोपचारासाठीही पैसे नसल्याने अनेक जेष्ठ नागरिक अडचणीत सापडले आहेत.
शिवसेनेने प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात, “महिन्याच्या महिन्याला नियमित पेन्शन जमा करावी, तसेच हयातीच्या दाखल्यासाठी वृद्धांना महा-ई-सेवा केंद्रात फिरवण्याऐवजी तलाठ्यांनी घरोघरी जाऊन पडताळणी करावी,” अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या हयातीच्या दाखल्यासाठी वृद्धांना ५० ते १०० रुपये खर्च करावे लागत असल्याने त्यांच्यावर आर्थिक भार पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
दरम्यान, डिसेंबर २०२४ मध्ये डीबीटी प्रक्रियेदरम्यान अनेक लाभार्थ्यांची सात ते आठ महिन्यांची पेन्शन रखडल्याचा मुद्दाही शिवसेनेने उपस्थित केला. शासनाने थकीत रक्कम तातडीने संबंधितांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.
करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी, “हयातीच्या दाखल्यासाठी वृद्धांना उन्हात फिरवण्याऐवजी तलाठ्यांनी सर्वे करून त्यालाच दाखला मान्यता द्यावी,” अशी भूमिका मांडली.
यावेळी तहसीलदार स्वप्निल पवार यांनी, “मागील आठ महिन्यांची थकीत यादी शासनाकडे पाठवण्यात आली असून दोन्ही स्तरावर निर्णय घेतला जाईल,” असे सांगितल्याची माहिती देण्यात आली.
या निवेदनावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, राहुल गिरुले, सुनील पारपाणी, दिपक अंकल, कैलास जाधव, बाबुराव पाटील, रामराव पाटील, गणेश चावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments: