धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; पत्नी गंभीर जखमी, चौघे आरोपी पोलीस कोठडीत.
धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून; पत्नी गंभीर जखमी, चौघे आरोपी पोलीस कोठडीत.
-------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------------
राधानगरी तालुक्यातील कोनोली पैकी फाले धनगरवाडा येथे एका ३५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत मृताचा पत्नी गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.
सूरज पांडुरंग फाले (वय ३५, सध्या रा. राजारामपुरी, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. तर पत्नी सोनिया सूरज फाले (वय ३०) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज फाले हा पत्नीसमवेत गावी आला असताना गावातील काही व्यक्तींशी त्याचा वाद झाला. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी घरासमोरील शेतात आरोपींनी धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वाद सोडवण्यासाठी पुढे आलेल्या पत्नी सोनिया यांच्या डोक्यावरही वार करण्यात आला, त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. तसेच घटनास्थळी उभी असलेल्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. पोलिसांना वाहनातून एक बंदूक आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
या प्रकरणातील संशयित आरोपी धोंडीराम बापू फाले, दगडू बापू फाले, बाबू ज्ञानू फाले व ज्ञानदेव धोंडीराम फाले हे चौघे स्वतःहून राधानगरी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू असून खुनाचे कारण जमिनीच्या वादातून असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

No comments: