Header Ads

दारूच्या वादातून आईकडून प्राणघातक हल्ला; जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू.

 दारूच्या वादातून आईकडून प्राणघातक हल्ला; जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू.

------------------------
शशिकांत कुंभार.
------------------------

गांधीनगर (प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे घरगुती वादातून आईने मुलावर केलेला हल्ला जीवघेणा ठरला. गंभीर जखमी झालेल्या सौरभ दिलीप निकम (वय २६, रा. गडमुडशिंगी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलीस व स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ याला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी तो वारंवार आईकडे पैशांची मागणी करत असे. याच कारणावरून घरात सतत वाद होत होते. शुक्रवारी (दि. १) झालेल्या वादावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने आई जयश्री सुरेश घाटगे यांनी संतापाच्या भरात सौरभच्या डोक्यावर चिऱ्याची वीट मारली. या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेत त्याला प्रथम गांधीनगर येथील रुग्णालयात उपचार देण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे सोमवारी त्याचा मृत्यू झाला, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आई जयश्री घाटगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अतुल कदम पुढील तपास करत आहेत. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

No comments:

Powered by Blogger.