Header Ads

हायवेवरील हॉटेलमध्ये क्रिकेट सट्टा; एलसीबीची धाड, चौघे जेरबंद

 हायवेवरील हॉटेलमध्ये क्रिकेट सट्टा; एलसीबीची धाड, चौघे जेरबंद.

-------------------------

कोल्हापूर | प्रतिनिधी.

शशिकांत कुंभार.

-----------------------

कोल्हापूर–कागल राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सोमवारी रात्री अचानक धाड टाकत अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत अड्डा चालकासह चार जणांना अटक करण्यात आली असून सुमारे ३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील एका हॉटेलच्या रूममध्ये आयपीएल टी-२० सामन्यावर मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यावेळी मुंबई इंडियन्स व लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याचे स्पष्ट झाले.

या कारवाईत इचलकरंजी येथील अजित बाळासो कोरवी (अड्डा चालक), रेंदाळ येथील फारुख नजीर मुल्लाणी, चिकोडी (कर्नाटक) येथील जितेंद्र आप्पासाहेब घोडके आणि मुरगुड येथील जॉन्सन जेरून फर्नांडिस या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट व बेटिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ३ लाख ५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी कागल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महामार्गावरील हॉटेलांमधून सुरू असलेल्या बेकायदेशीर सट्टेबाजीवर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

No comments:

Powered by Blogger.