Header Ads

परळीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? पिकांचे नुकसान रोखण्यासाठी बंधाऱ्याचा प्रस्ताव वनखात्याकडे

 परळीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? पिकांचे नुकसान रोखण्यासाठी बंधाऱ्याचा प्रस्ताव वनखात्याकडे.

सातारा प्रतिनिधी

सज्जनगड परिसरातील परळी गावात दरवर्षी पावसाळ्यात ओढ्यांच्या पुरामुळे होणाऱ्या पिकांच्या मोठ्या नुकसानीवर अखेर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत सरसावली आहे. परळी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत वनखात्याकडे मातीचा बंधारा उभारण्याचा अधिकृत प्रस्ताव सादर केला असून, शेतकरी वर्गाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे ओढ्यांना पूर येऊन पाण्याचा वेग प्रचंड वाढतो. त्यामुळे सुपीक माती वाहून जाऊन शेतजमिनींचे मोठे नुकसान होते. या समस्येमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक फटका बसत असल्याने कायमस्वरूपी उपायाची मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने बंधाऱ्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे.

या उपक्रमासाठी सरपंच बाळासाहेब विठोबा पाटील, उपसरपंच समीर आसिफ मुलाणी, पत्रकार अमर इंदलकर तसेच स्थानिक शेतकरी यांनी एकत्र येत पुढाकार घेतला आहे. संबंधित ठिकाण वन विभागाच्या अखत्यारित येत असल्याने नियमानुसार बंधाऱ्याचे काम वनखात्यामार्फतच होणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतीने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, बंधारा उभारल्यास ओढ्याच्या पाण्याचा वेग नियंत्रित होऊन मृदधूप कमी होईल, शेतजमिनीचे संरक्षण होईल तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या प्रस्तावाकडे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ‘जीवनदायी उपाय’ म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने जागेची पाहणी करून बंधाऱ्याच्या कामाला मंजुरी द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामपंचायत व शेतकरी वर्गातून होत आहे. आता वनखात्याचा निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.