अल्पवयीन मुलीचा बालविवाह; पतीसह सासू-सासऱ्यांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा
अल्पवयीन मुलीचा बालविवाह; पतीसह सासू-सासऱ्यांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा.
-------------------------
अंबप| प्रतिनिधी.
किशोर जासूद.
---------------------------
हातकणंगले तालुक्यातील अंबप–मनपाडळे परिसरात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पतीसह सासू व सासऱ्यांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अंबप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी अधिकारी संतोष जयराम कांबळे (वय ४०, रा. पाचगाव, ता. करवीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २१९/२०२६ अन्वये नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन शरद शिंदे (वय २२), अनिता शरद शिंदे (वय ५६) व शरद रघुनाथ शिंदे (वय ६२, सर्व रा. मनपाडळे, ता. हातकणंगले) यांनी संगनमताने अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिला. विवाहाच्या वेळी पीडितेचे वय केवळ १७ वर्षे १० महिने २९ दिवस होते. ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपी पतीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
हा प्रकार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी तसेच त्यापूर्वी सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत अंबप व मनपाडळे परिसरात घडल्याचे नमूद आहे. संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून ४ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी भा.न्या.सं. कलम ६४(१)(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ व अन्य संबंधित तरतुदींसह बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कलम ९, १०, ११ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिले इनामदार करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बालविवाहाच्या घटनांबाबत प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

No comments: