Header Ads

मिरजेत ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत मोठी कारवाई; २ किलो गांजासह सराईत गुन्हेगाराचा नातेवाईक जेरबंद

 मिरजेत ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत मोठी कारवाई; २ किलो गांजासह सराईत गुन्हेगाराचा नातेवाईक जेरबंद

महात्मा गांधी चौक पोलिसांची धडक मोहीम; ५० हजारांचा मुद्देमाल जप्त.

--------------------

मिरज प्रतिनिधी :

-------------------

केंद्र सरकारच्या “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत सांगली जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मिरज येथे मोठी कारवाई करण्यात आली. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून तब्बल २ किलो तयार गांजा जप्त करत एका संशयिताला अटक केली. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई कैकाडी गल्ली, मिरज परिसरात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव बाशा अलीहुसेन सय्यद (वय ५७, रा. कैकाडी गल्ली, मिरज) असे आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या आणि गांजा विक्रीसह गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगार हुसेन बाशा सय्यद याच्या नातेवाईकांकडून अंमली पदार्थ विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेला गांजाचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गांजा जप्त केला व संशयिताला अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्यासह पोलिस पथकाने सहभाग घेतला.

महात्मा गांधी चौक पोलिसांनी यापूर्वीही कोरेक्स इंजेक्शन, सुगंधी तंबाखू, गांजा व अन्य नशायुक्त पदार्थांवर सातत्याने कारवाया केल्या असून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, नागरिकांनी परिसरात सुरू असलेल्या नशायुक्त पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सांगली जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.