“पावसाच्या आधीच रणधुमाळी! राधानगरी पूर्व भागात ‘धुळवाप’ पेरणीसाठी शेतकऱ्यांची झुंज”
“पावसाच्या आधीच रणधुमाळी! राधानगरी पूर्व भागात ‘धुळवाप’ पेरणीसाठी शेतकऱ्यांची झुंज”
डोंगरमाथे नांगरणीच्या आवाजाने दुमदुमले; बैलजोडी-ट्रॅक्टरच्या साथीने मशागतीला वेग.
--------------------------------------
राधानगरी, प्रतिनिधी विजय बकरे :
----------------------------------------
राधानगरी तालुक्याच्या पूर्व भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेती कामांना मोठा वेग आला असून, ‘धुळवाप’ पेरणीसाठी मशागतीची लगबग अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ढेरेवाडी ते घोटवडे परिसरातील डोंगरमाथे सध्या नांगरणीच्या आवाजाने दुमदुमून गेले आहेत.
तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील ढेरेवाडी, पिंपळवाडी, माजगाव, चक्रेश्वरवाडी, कौलव आणि घोटवडे या डोंगराळ भागात प्रामुख्याने जिरायती शेती केली जाते. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागात भात, नाचणी, जोंधळा, वरी आणि भुईमूग ही पिके घेतली जातात. मान्सून सक्रिय होण्यापूर्वी जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा घेत ‘धुळवाप’ पेरणी उरकण्यासाठी शेतकरी सध्या धावपळ करताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पहाटेपासूनच शेतात राबत असून नांगरणी, कुळवणी, बांधबंदिस्ती आणि सडे वेचण्याची कामे जोरात सुरू आहेत. जमिनीची धूप थांबवणे, माती भुसभुशीत करणे आणि पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी बांध घालण्यावर विशेष भर दिला जात आहे.
दरम्यान, आधुनिक यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी डोंगरदऱ्यातील चढ-उतार आणि अरुंद वावरांमुळे अनेक शेतकरी आजही बैलजोडीला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक शेती पद्धतींचा संगम या भागात पाहायला मिळत आहे.
गतवर्षी सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे मशागतीची कामे रखडली होती आणि अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याच अनुभवातून यंदा शेतकरी अधिक सतर्क झाले असून पाऊस सुरू होण्यापूर्वीच सर्व तयारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
“पाऊस कधी येईल याचा नेम नसतो. त्यामुळे खरिपाची तयारी आधीच करावी लागते. यंदा बैलजोडी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने मशागत पूर्ण करत आहोत, जेणेकरून पहिल्या पावसातच पेरणी करता येईल,” असे स्थानिक शेतकरी रमेश पाटील कोल्हापुरे यांनी सांगितले.
सध्या संपूर्ण पूर्व भागात ‘धुळवाप’ पेरणीसाठी शेतकरी कामात मग्न असून, बळीराजा आता वरुणराजाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

No comments: