माझं गाव आरोग्य संपन्न गाव उपक्रमाला सरूडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
माझं गाव आरोग्य संपन्न गाव उपक्रमाला सरूडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना मिळणार बक्षीस; तालुका ते राज्यस्तरावर स्पर्धा...
---------*--------------------------मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते.
-------------------------------------
शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सरूड व ग्रामपंचायत सरूड यांच्या संयुक्त विद्यमाने “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम उत्साहात पार पडला. “स्वच्छ सुंदर परिसर, निरोगी माणसांची साथ; आरोग्य संपन्न गाव धरून एकमेकांचा हात...” या घोषवाक्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गावातील प्रत्येक नागरिक निरोगी राहावा, स्वच्छतेबाबत जनजागृती वाढावी तसेच संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारावी, या हेतूने कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, पोषण आहार, पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंध, नियमित आरोग्य तपासणी, माता-बाल संगोपन व लसीकरण यासंदर्भात नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” ही स्पर्धा तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तर अशा टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गावाच्या स्वच्छता, आरोग्य सुविधा, नागरिकांचा सहभाग, जनजागृती, कचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि विविध निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात येणार असून ज्या गावाला सर्वाधिक गुण मिळतील त्या गावाला शासनाच्या वतीने विशेष बक्षीस व सन्मान देण्यात येणार आहे. त्यामुळे गावागावांमध्ये निरोगी आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्या धनश्री रोडे-पाटील यांनी गावाचा सर्वांगीण विकास हा नागरिकांच्या आरोग्यावर अवलंबून असल्याचे सांगितले. गाव स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामपंचायत सरपंच भगवान नांगरे-पाटील यांनी “आरोग्य संपन्न गाव” ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज व्यक्त केली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वाघमारे यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारे आजार, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच स्वच्छतेची सवय अंगीकारण्याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य सहाय्यक आर. एम. पाटील आणि आरोग्य सहाय्यिका मंगल चौरे यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागातील सर्व स्टाफ आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे गावात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून “स्वच्छ गाव – निरोगी गाव” हा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
सरूड ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून भविष्यात गावाला तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळावे, यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments: