" डिझेल न मिळाल्याने शेतकऱ्यांनी दिली गोरसेनाला हाक : 'कलेक्टरची परवानगी आणा' म्हणत पंप वाल्यांची अडवणूक, शेतकरी संघटनाही आक्रमक"
" डिझेल न मिळाल्याने शेतकऱ्यांनी दिली गोरसेनाला हाक : 'कलेक्टरची परवानगी आणा' म्हणत पंप वाल्यांची अडवणूक, शेतकरी संघटनाही आक्रमक"
-------------------------
पुसद तालुका प्रतिनिधी.
----------------------------
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पुसद तालुक्यात शेतकऱ्यांसमोर डिझेलचे मोठे संकट उभे राहिले आहे. ट्रॅक्टरसाठी व कॅनमध्ये डिझेल मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल पंप चालक "कलेक्टर साहेबांची परवानगी घेऊन पत्र आणा, तरच डिझेल देऊ" असे सांगून परत पाठवत आहेत. त्यामुळे नांगरणी, वखरणीची कामे ठप्प झाली असून संतप्त शेतकऱ्यांनी गोरसेना पश्चिम यवतमाळचे जिल्हाध्यक्ष जय राठोड यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी सुद्धा सोबत निवेदन देऊन प्रशासनाला धारेवर धरले आहे.
या प्रकरणी जय राठोड व मनीष जाधव यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 2 दिवसात लेखी आदेश काढण्याची मागणी केली आहे. "शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल नाकारणे म्हणजे शेती बुडवण्याचा डाव आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार शेतीसाठी डिझेल नाकारता येत नाही. तरीही पंप वाले मनमानी करत आहेत.
"हा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे" : मनीष जाधव यांचा आरोप*
शेतकरी नेते मनीष जाधव म्हणाले, "यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. डिझेल न मिळाल्याने जर पेरणी लांबली तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल. पंप वाले 'कलेक्टरची परवानगी' या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. असा कोणताही GR नाही. हा निव्वळ शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा."
"शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण?" : गोरसेना-स्वाभिमानी शेतकरी संघटना सवाल
"वेळेवर नांगरणी-वखरणी झाली नाही तर पेरणी लांबणीवर पडेल. उत्पादन घटेल आणि शेतकरी कर्जाच्या खाईत जाईल. डिझेल न मिळाल्याने जर एखाद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले तर त्याला प्रशासन व हे पंप वाले जबाबदार राहतील," असा संतप्त सवाल दोन्ही संघटनेने उपस्थित केला.
गोरसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख मागण्या :
1. पुसद तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांनी ट्रॅक्टर व कॅनमध्ये डिझेल द्यावे" असा लेखी आदेश 48 तासात काढावा.
2. डिझेलचा काळाबाजार करणाऱ्या पंपांवर धाडी टाकण्यासाठी भरारी पथक नेमावे व परवाने रद्द करावेत.
3. तहसील स्तरावर 24x7 हेल्पलाईन सुरू करून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला तात्काळ डिझेल उपलब्ध करून द्यावे.
4. तालुक्यात डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी.
"आदेश न निघाल्यास तहसीलवर धडक" : संयुक्त आंदोलनाचा इशारा* "जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा गोरसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना हजारो शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालय, पुसद येथे बेमुदत ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करेल. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची राहील," असा संयुक्त इशारा जय राठोड व मनीष जाधव यांनी दिला आहे.

No comments: