Header Ads

गांधीनगरमध्ये अवैध धंद्यांचे ‘मोबाईल नेटवर्क’ सक्रिय?

 गांधीनगरमध्ये अवैध धंद्यांचे ‘मोबाईल नेटवर्क’ सक्रिय?

IPL बेटिंगच्या चर्चांपासून वाहतूक कोंडीपर्यंत अनेक प्रश्न; नागरिकांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची मागणी.

---------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी :

शशिकांत कुंभार.

--------------------------

करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, वाढती वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक व व्यापारी वर्गात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मटका, गुटखा, गावठी दारू, गोवा बनावटीच्या मद्याची कथित विक्री तसेच काही व्यवहार मोबाईल आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून गुप्तपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या सुरू असलेल्या IPL सामन्यांच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी ऑनलाइन बेटिंग किंवा सट्टेबाजी सुरू असल्याच्याही चर्चा रंगत आहेत. मोबाईल कॉल, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे बोलले जात असून, याबाबत संबंधित यंत्रणांनी तांत्रिक तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे. मात्र या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

गांधीनगर परिसर हा पश्चिम महाराष्ट्रातील मोठा व्यापारी भाग मानला जातो. कपडे आणि विविध वस्तूंच्या होलसेल व्यापारामुळे येथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. विशेषतः तावडे हॉटेल परिसर आणि ट्रान्सपोर्ट लाईन भागात कायम वाहतूक कोंडी होत असल्याने व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्याच्या हातातील पैशांची बॅग लंपास झाल्याच्या घटनेनंतर व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. तसेच वळिवडे रेल्वे स्थानक परिसरातील व्हायरल झालेल्या कथित तलवारबाजीच्या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीबाबत काही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व चर्चांची वस्तुनिष्ठ दखल घेऊन अवैध धंदे, ऑनलाइन बेटिंग, वाहतूक कोंडी आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी व्यापारी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

कायद्याचा धाक कायम राहण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी पारदर्शक व प्रभावी कारवाई होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

भाग एक 

No comments:

Powered by Blogger.