महामार्गाच्या खोल खड्ड्यात पडला ‘गवा’; जाधववाडीत थरारक रेस्क्यू ऑपरेशन.
महामार्गाच्या खोल खड्ड्यात पडला ‘गवा’; जाधववाडीत थरारक रेस्क्यू ऑपरेशन
४० फुट खोल खड्ड्यात जखमी अवस्थेत सापडला गवा; वन विभागाची धावपळ, दोन पाय फ्रॅक्चरची शक्यता.
-----------------------------------मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते :
------------------------------------
शाहूवाडी तालुक्यातील जाधववाडी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या परिसरात आज पहाटे एका जखमी गव्याला वन विभागाने थरारक बचाव मोहिमेद्वारे बाहेर काढत जीवदान दिले. रस्ता ओलांडताना तो रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या तब्बल ३५ ते ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
आज पहाटे पाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी जखमी गवा पडल्याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत सावधगिरीने आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर गव्याला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.
जखमी गव्याला घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील उपचारासाठी सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीत गव्याचे दोन पाय फ्रॅक्चर झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान वन विभागाने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता विशेष ठरली. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम, वनपाल पी. बी. चव्हाण, आशिष पाटील, वनरक्षक गुरूबच्चन हिप्परकर, अक्षय चौगुले, ऋषिकेश झांजुर्णे, दत्त मुखाडे, आबासाहेब परिट, सुरेश पाटील तसेच वनसेवक टीम आणि जलद कृती दलाने बचाव कार्यात सहभाग घेतला.
याशिवाय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली सर्वदे व डॉ. संतोष वाळवेकर यांनीही उपचारासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या घटनेमुळे महामार्ग कामांच्या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

No comments: