वडिलांच्या निधनानंतरही हार नाही; शुभमचे यश आणि स्वप्नालीची सात वर्षांची तपश्चर्या..
वडिलांच्या निधनानंतरही हार नाही; शुभमचे यश आणि स्वप्नालीची सात वर्षांची तपश्चर्या.
----------------------------------
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर पन्हाळा तालुक्यातील कोदवडे येथील दोन तरुणांनी मुंबई पोलीस भरतीत यश मिळवत गावाचा मान उंचावला आहे. कु. स्वप्नाली संजय शियेकर आणि शुभम शंकर पाटील हे कोदवडे गावातील पहिले पोलीस ठरले असून त्यांच्या यशामुळे संपूर्ण धामणीखोऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कु. स्वप्नाली शियेकर हिने तब्बल सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिने ध्येयापासून कधीही माघार घेतली नाही. तिचे वडील डी. वाय. पाटील साखर कारखान्यात कर्मचारी असून आई शेती व घरकाम सांभाळते. आई-वडिलांचे पाठबळ आणि संतोष पाटील सर यांचे मार्गदर्शन यामुळे स्वप्नालीला हे यश मिळाले.
दुसरीकडे शुभम पाटील याची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गेली सहा वर्षे पोलीस भरतीसाठी मेहनत घेत असताना त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. वडिलांच्या आजारपणामुळे घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती. संघर्ष सुरू असतानाच गेल्या महिन्यात वडिलांचे निधन झाले. मात्र या दुःखातून सावरत शुभमने आपले ध्येय कायम ठेवले आणि याच महिन्यात त्याच्या यशाचा निकाल हाती आला. आई, मामा आणि आयडियल करिअर अकॅडमी, म्हासुर्लीचे प्रशिक्षक सरदार भित्तम सर यांच्या मार्गदर्शनामुळे त्याने हे यश संपादन केले.
दोघांनीही लेखी व मैदानी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले. त्यांच्या यशामुळे कोदवडे गावासह संपूर्ण धामणीखोऱ्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गावातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या यशोगाथेने एक संदेश दिला आहे—परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि सातत्य असेल तर यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो.

No comments: