Header Ads

कोरोना काळातील रद्द मुक्काम गाड्या पुन्हा सुरु करा* प्रवासी वर्गातून मागणी


कोरोना काळातील रद्द मुक्काम गाड्या पुन्हा सुरु करा,प्रवासी वर्गातून मागणी

















 मुरगूड/ जोतीराम कुंभार

गारगोटी आगाराकडून मुरगुडला नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिली जात असून कोरोना काळात तत्कालीन परिस्थितीमध्ये रद्द करण्यात आलेल्या मुक्कामाच्या अनेक गाड्या आजही बंद स्थितीतच ठेवल्या आहेत. वाघापूर, निपाणी, बोळावी, हमीदवाडा आणि कापशी या मुक्कामाच्या गाड्या कोरोना काळापासून जे बंद आहेत ते आजही बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि अन्य प्रवासी यांची गैरसोय होत आहे.  म्हणूनच या गाड्या पूर्ववत सुरु करा अशी मागणी प्रवाशी व विक्यार्थी वर्गातून होत आहे.

       पळशिवणे, काळम्मा बेलेवाडी, चिखली या मुक्काम गाड्या देखील कायमस्वरूपी बंद ठेवल्या आहेत. दरवर्षी शालेय सुट्टीच्या काळात बंद झालेल्या एसटी बसच्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना आंदोलनाचा इशारा देऊनच त्या सुरू करण्याचा आग्रह धरावा लागतो. मुरगुड ते निपाणी मार्गावर सकाळी १०.३० ते १२.३० आणि सायंकाळी ६ ते ८.३० पर्यंत एकही बसची व्यवस्था नाही. तसेच निपाणीहून मुरगूडला येण्यासाठी  मार्गावर सकाळी १०.३० ते १२.३० आणि संध्याकाळी ७ नंतर १० वाजेपर्यंत एकही बसची सोय नाही.

       गारगोटी आगाराची हळदी -बेनिग्रे मार्गे निपाणी ही मुक्काम गाडी रद्द करून सध्या ती हमीदवाडापर्यंतच धावते. यामुळे हळदी, बेनिक्रे व हमिदवाडातील अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला यांना निपाणी गाडीसाठी गावापासून पायपीट करीत निपाणी रस्त्याला जावे लागत आहे. या मार्गावर एकही थेट निपाणीला जाणारी बस नाही. दुपारी २. ३० वा. ची बोळावी बस कोरोना काळापासून बंद आहे. ती अद्याप सुरू नाही. मुरगूडमध्ये बऱ्याचवेळा बोळावी, कापशी, हमीदवाडा या रूट वरील गाड्या ऐनवेळी रद्द करून त्या आदमापुर आणि कोल्हापूरकडे पाठवल्या जातात. दुर्गम भागातील या गावांना जाणाऱ्या गाड्या अचानकपणे  रद्द केल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण होते.

       काही वर्षांपूर्वी गारगोटीच्या आगार प्रमुख रॉड्रिक्स यांना मुरगुडच्या आगारात याच कारणावरून आंदोलनकर्त्यांनी कोंडून ठेवले होते. पुन्हा अशी आफत यायची नसेल तर गारगोटी आगाराने वेळीच व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावेत अशी प्रवाशांची मागणी आहे.

       गारगोटी आगारांतर्गत असणाऱ्या मुरगुड बसस्थानकाला निपाणीकडे जाणाऱ्या सर्वच गाड्या राधानगरी आगाराकडूनच मिळतात. मुरगूड बस स्थानकावर एकही राखीव गाडी असत नाही. त्यामुळे रद्द झालेल्या बससाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे  या मार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. सध्या विविध योजनांचे लाभार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच महिला -मुली यांना अशा रद्द झालेल्या मार्गावर प्रवास करण्यास अन्य पर्याय नसल्यामुळे त्यांची अशावेळी मोठी गोची होत आहे.

           पालकमंत्र्यांचे रहिवास ठिकाण गारगोटी असल्यामुळे बऱ्याचदा भुदरगड तालुक्यातील एखाद्या गाडीच्या मंत्र्यांच्या आग्रहाचा दबाव आगारावर असल्यामुळे मुरगुड कडील अचानक गाडी रद्द होण्याचाही प्रकार मुरगूडकारांना बऱ्याचदा त्रासदायक ठरत आहे. भुदरगडकराची सोय करताना नेहमीच मुरगूडवर अन्याय होतो. ही संतापजनक बाबही निदर्शनास येत आहे.

No comments:

Powered by Blogger.