IPL फॅन पार्कमध्ये ‘बीम लाईट’चा धिंगाणा; पोलिसांची धडक कारवाई, आयोजकांसह लाईट मालकावर गुन्हा
IPL फॅन पार्कमध्ये ‘बीम लाईट’चा धिंगाणा; पोलिसांची धडक कारवाई, आयोजकांसह लाईट मालकावर गुन्हा.
कोल्हापूर : आयपीएल सामन्यांच्या थेट प्रक्षेपणासाठी आयोजित करण्यात आलेल्या “फॅन पार्क 2026” कार्यक्रमात नियमांना हरताळ फासत अतितीव्र “Sharpy / Beam” लाईटचा वापर केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत आयोजकांसह लाईट मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कोल्हापूरातील क्रिकेटप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने कसबा बावडा रोडवरील मेरी वेदर मैदान येथे 23 आणि 24 मे रोजी “फॅन पार्क 2026” चे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या पडद्यावर आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण सुरू असताना कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळली होती.
दरम्यान, कार्यक्रमासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तींचे पालन होत आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी पोलिस पथकासह कार्यक्रमस्थळी भेट दिली. रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास आयोजकांकडून अतितीव्र प्रकाशझोत असलेल्या “Sharpy / Beam” लाईट्सचा वापर होत असल्याचे उघडकीस आले.
हे लाईट्स सतत फ्लॅशिंग स्वरूपात सुरू असल्याने परिसरातील नागरिक, कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षक तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास होत होता. विशेष म्हणजे या लाईट्समुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेलाही बाधा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी संबंधित आयोजक आणि लाईट व्यवस्थापकांना तत्काळ लाईट्स बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने पोलिसांनी वापरात असलेल्या “Sharpy / Beam” लाईट्स थेट ताब्यात घेतल्या.
या प्रकरणी आयोजक मदन शेळके (रा. कोल्हापूर) आणि लाईट मालक विजयराज बपनपल्ली (रा. हुबळी-धारवाड) यांच्याविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. 382/2026 अंतर्गत भा. न्या. संहिता कलम 223 आणि 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
“फॅन पार्क”च्या जल्लोषात नियमांची पायमल्ली केल्याने आता आयोजकांच्या अडचणीत मोठी भर पडली असून, या कारवाईची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे.

No comments: