डिलिव्हरी कंपनीचे ऑफिस फोडणारा चोरटा जेरबंद! पाच दिवसांत गुन्हा उघड; दीड लाखांची रोकड जप्त.
डिलिव्हरी कंपनीचे ऑफिस फोडणारा चोरटा जेरबंद! पाच दिवसांत गुन्हा उघड; दीड लाखांची रोकड जप्त.
-------------------------------राजु कदम.
-----------------------------
सांगली प्रतिनिधी : जत येथील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीचे कार्यालय फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करत अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला. आरोपीकडून १ लाख ५२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जत शहरातील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीच्या कार्यालयात २४ मेच्या रात्री ते २५ मेच्या पहाटेदरम्यान घरफोडी झाली होती. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला १ जून रोजी नागज फाटा परिसरात संशयित आरोपी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.
पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून संशयित वैभव बबन जाधव (वय २५, रा. डोसेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेत १ लाख ५२ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली.
सखोल चौकशीत आरोपीने आपल्या वडिलांच्या मदतीने जतमधील पार्सल कंपनीच्या कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर जप्त रक्कम पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली असून आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
🔎 फरार आरोपीवर अनेक जिल्ह्यांत गुन्हे
या गुन्ह्यातील दुसरा आरोपी बबन सर्जेराव जाधव हा अद्याप फरार असून त्याच्यावर कोल्हापूर, पुणे, नाशिक, सोलापूर, धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये कुरिअर व पार्सल कार्यालय फोडल्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो सराईत गुन्हेगार असल्याचेही तपासात समोर आले आहे.
👮 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
"गुप्त माहिती, अचूक नियोजन आणि तातडीच्या कारवाईमुळे डिलिव्हरी कंपनीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे."

No comments: