Header Ads

चप्पल विकणाऱ्या वडिलांचे कष्ट, बकऱ्या राखणाऱ्या आईची माया; एकाच घरातील दोन्ही लेकरे महाराष्ट्र पोलिस दलात!

 चप्पल विकणाऱ्या वडिलांचे कष्ट, बकऱ्या राखणाऱ्या आईची माया; एकाच घरातील दोन्ही लेकरे महाराष्ट्र पोलिस दलात!हाजगोळीच्या कष्टकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा; संघर्ष, संस्कार आणि चिकाटीचा सुवर्णविजय

चंदगड.

"गरीबी माणसाची स्वप्ने थांबवू शकत नाही," याचा प्रत्यय चंदगड तालुक्यातील हाजगोळी गावातील एका कष्टकरी कुटुंबाने संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे. गावोगावी फिरून चप्पल विकणारे वडील आणि बकऱ्या-जनावरे राखून संसाराचा गाडा हाकणारी आई... पण मुलांना मोठे करण्याचे स्वप्न मात्र आभाळाएवढे! त्या स्वप्नाला आज यशाची सुवर्णकिनार लाभली असून या कुटुंबातील दोन्ही मुले महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाली आहेत.

दोन वर्षांपूर्वी कन्या माधुरी हिने कठोर परिश्रमाच्या जोरावर मुंबई पोलिस दलात स्थान मिळवत सध्या मीरा-भाईंदर येथे कर्तव्य बजावत आहे. आता मोठा मुलगा आनंद याची अहमदनगर पोलिस दलात निवड झाल्याने हाजगोळी गावासह संपूर्ण चंदगड तालुक्यात आनंदोत्सव साजरा होत आहे.

या कुटुंबाकडे ना शेती, ना मोठी मालमत्ता; मात्र आई-वडिलांची मेहनत आणि मुलांवरील विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती ठरली. गावोगावी चप्पल विकणे, बकऱ्या राखणे, मजुरी करणे अशी कोणतीही मेहनतीची कामे कमीपणाची न मानता त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक रुपया खर्च केला. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांचे भविष्य घडविण्यासाठी त्यांनी आयुष्य झिजवले.

माधुरीच्या यशानंतर आनंदनेही पोलिस भरतीचे स्वप्न उराशी बाळगले. पहाटेची धाव, दिवसभराचा शारीरिक सराव आणि तासन्तास अभ्यास करत त्याने स्वतःला पोलिस भरतीसाठी तयार केले. उन्हाळा, पाऊस आणि थंडीची पर्वा न करता त्याने चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले. अनेक अडचणी आणि मानसिक ताण आले, तरी आई-वडिलांचे कष्ट डोळ्यांसमोर ठेवत तो कधीच मागे हटला नाही.

या प्रवासात मोठ्या बहिणी रंजना आणि वंदना यांचाही मोलाचा वाटा राहिला. संपूर्ण कुटुंबाने आनंदचे स्वप्न स्वतःचे मानत प्रत्येक टप्प्यावर त्याला आधार दिला. अखेर त्याच्या अथक परिश्रमाला यश मिळाले आणि अहमदनगर पोलिस दलात त्याची निवड झाली.

आज या कुटुंबाचे यश हे केवळ दोन मुलांच्या सरकारी नोकरीपुरते मर्यादित नाही; तर ते आई-वडिलांच्या त्यागाचा, कष्टाचा आणि संस्कारांचा विजय आहे. चप्पल विकणाऱ्या वडिलांच्या आणि बकऱ्या राखणाऱ्या आईच्या लेकरांनी महाराष्ट्र पोलिस दलात मानाचे स्थान मिळवत ग्रामीण भागातील हजारो युवकांसाठी प्रेरणेचा आदर्श निर्माण केला आहे.

हाजगोळी गावात या यशाचा आनंदोत्सव साजरा होत असून सर्व स्तरांतून या कष्टकरी कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परिस्थिती नव्हे, तर जिद्द, मेहनत आणि पालकांचे संस्कारच माणसाला मोठे बनवतात, हे या कुटुंबाने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

No comments:

Powered by Blogger.