Header Ads

डिक्की फोडणारा आंतरराज्यीय 'मास्टरमाईंड' जेरबंद! जुना राजवाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई;

 डिक्की फोडणारा आंतरराज्यीय 'मास्टरमाईंड' जेरबंद! जुना राजवाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; कर्नाटक-गोव्यातील गुन्ह्यांचे धागेदोरे उलगडले

------------------------------------------
प्रतिनिधी : रहिम पिंजारी | कोल्हापूर.
-----------------------------------------

कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी परिसरात दुचाकीच्या डिक्कीतून रोकड चोरणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय चोरट्याला जुना राजवाडा पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठे यश मिळवले आहे. अटकेनंतरच्या चौकशीत या आरोपीचे कर्नाटक आणि गोवा राज्यांतील चोरीच्या गुन्ह्यांशीही संबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या कारवाईमुळे आंतरराज्यीय चोरीच्या टोळीचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संतोष हनुमंत कट्टीमणी (वय ४१, रा. निंबाळ, ता. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) असे आहे.

डिक्की उघडून केली रोकड लंपास

१९ जून २०२६ रोजी सकाळी मिरजकर मार्केट परिसरात उभी असलेल्या इलेक्ट्रिक मोपेडची डिक्की उघडून फिर्यादी संतोष दिगंबर शिंदे यांच्या रोख रकमेवर चोरट्याने डल्ला मारला होता. या घटनेनंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने आरोपी गजाआड

गुन्ह्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा माग काढला. पेट्रोलिंगदरम्यान पोलीस कर्मचारी अमर पाटील आणि प्रशांत घोलप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे २६ जून रोजी भेंडे गल्ली परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता डिक्की उघडण्यासाठी वापरला जाणारा टेस्टर जप्त करण्यात आला.

कबुली, रोकड आणि मुद्देमाल जप्त

चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ५,५०० रुपयांची रोकड आणि चोरीत वापरलेला टेस्टर असा एकूण ९,२२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आंतरराज्यीय गुन्ह्यांचे धागेदोरे

पोलिस तपासात आरोपीवर कर्नाटक व गोवा राज्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधून अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.