12 तासांत गुन्हा उघड! भरदिवसा झालेल्या गोळीबारातील दोन्ही शूटर एलसीबीच्या जाळ्यात; 'सुपारी कनेक्शन'चा संशय.
12 तासांत गुन्हा उघड! भरदिवसा झालेल्या गोळीबारातील दोन्ही शूटर एलसीबीच्या जाळ्यात; 'सुपारी कनेक्शन'चा संशय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कोल्हापूर शहराला गुरुवारी भरदिवसा हादरवून सोडणाऱ्या सुरज साखरे गोळीबार प्रकरणाचा अवघ्या 12 तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) दोन संशयित शूटरांना अटक केली आहे. रफीक उर्फ देवा पिरसाहेब मुल्ला (वय 39, रा. विक्रमनगर, कोल्हापूर) आणि शहाबाज राजू मुल्ला (वय 23, रा. मणेरमळा, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. या हल्ल्यामागे 'सुपारी'चा अँगल असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या दृष्टीने सखोल तपास सुरू आहे.
गुरुवारी (दि. 16 जुलै) दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास नवीन वाशी नाका–फुलेवाडी रिंग रोडवरील स्टार लोकल मार्टजवळ मोक्का अंतर्गत गुन्ह्यांमध्ये जामिनावर असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज साखरे याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी भररस्त्यात गोळीबार केला होता. या हल्ल्यात साखरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धाडसी हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. एलसीबीची दोन विशेष पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान पोलीस कर्मचारी वैभव पाटील यांना आरोपी कर्नाटकातून परत येऊन अंकली पूल, जयसिंगपूर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कसून चौकशीनंतर सुरज साखरेवर जीवघेणा गोळीबार केल्याची कबुली दिली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा हल्ला सुपारी घेऊन करण्यात आला असण्याची शक्यता असून, त्यामागील सूत्रधार कोण, आर्थिक व्यवहार, जुने वैर किंवा गुन्हेगारी टोळ्यांतील संघर्ष याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत.
अवघ्या 12 तासांत भरदिवसा झालेल्या खळबळजनक गोळीबाराचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात एलसीबीला यश आल्याने कोल्हापूर पोलिसांच्या तपासाची वेगवान कामगिरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

No comments: