Header Ads

एकाच आरोपीकडून ५ दुचाकी जप्त! शाहूपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १.५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

एकाच आरोपीकडून ५ दुचाकी जप्त! शाहूपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १.५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

कोल्हापूर | प्रतिनिधी- शशिकांत कुंभार.

----------------------------------------------

कोल्हापूर शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत एका सराईत वाहनचोराला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून तब्बल ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत ₹१ लाख ५३ हजार इतकी आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अभिजीत विश्वास देसाई (वय ३९) असे असून तो मूळचा उमा टॉकीज पाठीमागे, जयशिवराय गल्ली, रविवार पेठ, कोल्हापूर येथील रहिवासी असून सध्या पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे वास्तव्यास आहे.

या प्रकरणात फिर्यादीच्या वडिलांच्या मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच ०९ डीएस ५२८५) ही मोटारसायकल मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत आवळे आणि गौरव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी रामकृष्ण लॉन, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे येणार आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर त्याने दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याच्याकडून आणखी चार चोरीच्या दुचाकींचा उलगडा झाला. अशा एकूण ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार अभिजीत उरुणकर करीत आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस अंमलदार अभिजीत उरुणकर, अमित प्रधान, मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, सुशीलकुमार गायकवाड, महेश पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, सनिराज पाटील, कृष्णात पाटील, रवि आंबेकर, गौरव शिंदे, सचिन पांगे आणि प्रशांत आवळे यांनी सहभाग घेतला.

No comments:

Powered by Blogger.