सांगली पोलिसांचा डिजिटल सुरक्षा मंत्र! 20 हजार विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, अंमली पदार्थ आणि महिला सुरक्षेचे धडे
सांगली पोलिसांचा डिजिटल सुरक्षा मंत्र! 20 हजार विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, अंमली पदार्थ आणि महिला सुरक्षेचे धडे..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कार्यक्रमात डॉ. चंद्रशेखर हळींगळे यांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दुष्परिणाम स्पष्ट करत, तरुणांनी व्यसनाला ठामपणे "नाही" म्हणण्याचे आवाहन केले. व्यायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले.
सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचे प्रभावी मार्गदर्शन केले. अनोळखी लिंक, APK फाईल्स आणि सोशल मीडियावरील फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करत सुरक्षित इंटरनेट वापराबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी डिजिटल अरेस्ट, जादा परताव्याच्या बनावट योजना, फिशिंग लिंक आणि ऑनलाइन आर्थिक फसवणूक यांसारख्या वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांना सावध केले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास '112' आपत्कालीन हेल्पलाईन आणि सायबर फसवणुकीसाठी '1930' सायबर हेल्पलाईनचा तात्काळ वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः जागरूक राहून आपल्या कुटुंबीयांनाही डिजिटल सुरक्षेबाबत माहिती देण्याचे आवाहन केले.
हा संपूर्ण कार्यक्रम सांगली पोलीस दलाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट (Live) प्रक्षेपित करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांनी ऑनलाइन सहभाग नोंदवत या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, सजग आणि जबाबदार नागरिक बनविण्याच्या दिशेने सांगली पोलीस दलाने राबविलेला हा उपक्रम विशेष कौतुकास पात्र ठरला.

No comments: