Header Ads

खामुंडी येथील जिल्हा परिषद शाळेत वारकरी दिंडीचे उत्साहात आयोजन.

 खामुंडी येथील जिल्हा परिषद शाळेत वारकरी दिंडीचे उत्साहात आयोजन.  

~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिनिधी -कैलास बोडके.
~~~~~~~~~~~~~~~~~

खामुंडी :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर खामुंडी(ता. जुन्नर )येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव जागृत व्हावा यासाठी दि. २८जुलै रोजी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी शाळेच्या प्रांगणातून ही दिंडी काढण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ भगवी पताका, टाळ, मृदंगाच्या गजरात "ज्ञानोबा माऊली तुकाराम" च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. लहान विद्यार्थी वारकरी वेशात, डोक्यावर टोपी, गळ्यात तुळशीमाळ आणि हात पताका घेऊन सहभागी झाले होते.

शाळेच्या मुख्याध्यापीका सविता हिरे यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करून प्रारंभ झाला. दिंडी शाळेपासून गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराच्या प्रांगणातून मुख्य मार्गावरून फिरून पुन्हा शाळेत आली. यावेळी अभंग, भजने आणि वारकरी संप्रदायातील माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितली. 

याप्रसंगी मुख्याध्यापीका हिरे बोलताना म्हणाल्या , "नवीन पिढीला महाराष्ट्राची वारकरी परंपरा, संत साहित्य आणि मूल्ये कळावीत यासाठी शाळेत दरवर्षी अशी दिंडी काढतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता आणि भक्तिभाव वाढतो."

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक सुखदेव पथवे, शोभा खर्गे, दिपाली डुंबरे, काशिनाथ इले आणि पालकांनी परिश्रम घेतले. दिंडीच्या समारोपानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आणि शाळेच्या या उपक्रमामुळे गावात आषाढीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले.

No comments:

Powered by Blogger.