Header Ads

दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद.सहा आरोपी अटकेत, १४.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

 दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद.सहा आरोपी अटकेत, १४.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील सहा जणांना अटक केली आहे.  

आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे तसेच चोरीची बोलेरो जीपसह एकूण १४ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र व तेलंगणातील २० गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे.

सोनूकसिंग कपूरसिंग टाक (30, हडपसर, पुणे), पिलूकसिंग शेरसिंग दुधानी (40, खोपोली, रायगड), करणसिंग गगनसिंग टाक (27, परभणी), पंकजसिंग काळूसिंग शिकलगार उर्फ दुधानी (40, अंबरनाथ), पापीसिंग उर्फ कृष्णसिंग साहेबसिंग टाक (18, परभणी) आणि मंगलसिंग मायासिंग दुधानी (58, परभणी) या सहाही आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून चौकशीदरम्यान दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीचे एकूण २० गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये दोन दरोडे, एक दरोड्याचा प्रयत्न, दोन जबरी चोरी, १३ घरफोडी आणि दोन वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच या आरोपींवर यापूर्वी महाराष्ट्र, तेलंगणा व इतर राज्यांत ५० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा मोठा पर्दाफाश झाला असून पुढील तपासातून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, ओतूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरातील ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याने करण्यात आली आहे.

No comments:

Powered by Blogger.