हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र : शाहूपुरी पोलिसांकडून ७५ वृक्षांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार.
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र : शाहूपुरी पोलिसांकडून ७५ वृक्षांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार.
कोल्हापूर | प्रतिनिधी
पर्यावरणातील बदल, वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे वाढणाऱ्या जागतिक तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या महत्त्वाकांक्षी मोहिमेला शाहूपुरी पोलिसांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
राज्यात 2026 ते 2047 या 21 वर्षांच्या कालावधीत 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच दरवर्षी 15 जून ते 30 सप्टेंबर हा कालावधी वन महोत्सव म्हणून साजरा केला जातो.
याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला 10 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने गोळीबार मैदान, कसबा बावडा येथे 75 वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत काकंडकी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल डोईजड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत आटपाडकर, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, सहाय्यक फौजदार विजय पाटील यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
या वृक्षारोपण मोहिमेतून पर्यावरण संवर्धनाबरोबरच नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे हरित व समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प शाहूपुरी पोलिसांनी व्यक्त केला.

No comments: