चिखलीत स्मार्ट मीटरला अचानक आग! घराबाहेर बसवलेले मीटर जळून खाक; सुरक्षिततेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह.
चिखलीत स्मार्ट मीटरला अचानक आग! घराबाहेर बसवलेले मीटर जळून खाक; सुरक्षिततेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे महावितरणने नुकतेच बसविलेल्या स्मार्ट मीटरने गुरुवारी अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. रवींद्र चिमगावकर यांच्या घराबाहेर बसवलेले स्मार्ट मीटर काही क्षणांतच जळून खाक झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने वेळेत आग आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाले नाही.
स्मार्ट मीटरच्या वापराबाबत राज्यभरात विविध स्तरांवर आधीच विरोध सुरू असताना या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्मार्ट मीटरविरोधातील नाराजी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जळालेला स्मार्ट मीटर हटवून परिसर सुरक्षित केला तसेच घटनेचा प्राथमिक पंचनामा करून तपास सुरू केला.
दरम्यान, स्मार्ट मीटरला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड की अन्य कोणते कारण याचा शोध महावितरणकडून घेतला जात असून सविस्तर चौकशीनंतरच कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महावितरणने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

No comments: