महालक्ष्मी ज्वेलर्स फोडणारा सराईत चोर जेरबंद; ६.९२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
महालक्ष्मी ज्वेलर्स फोडणारा सराईत चोर जेरबंद; ६.९२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
~~~~~~~~~~~~~~~~~अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल दादासो जमदाडे (वय २९, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) असे आहे.
९ जुलै रोजी मणेराजुरी येथील महालक्ष्मी ज्वेलर्सचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने मदनभाऊ पाटील बालउद्यान परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून चोरीतील चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. कसून चौकशीत त्याने महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत आरोपीकडून ६ लाख ३२ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली पक्कड जप्त करण्यात आली आहे. आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. सागर टिंगरे, सुनिल जाधव, दरिबा बंडगर व त्यांच्या पथकाने केली.

No comments: