करवीर पोलिसांचा धडाका! हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; लॉजमालकाला बेड्या...
करवीर पोलिसांचा धडाका! हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; लॉजमालकाला बेड्या....
~~~~~~~~~~~~~कोल्हापूर :- करवीर तालुक्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाच्या रॅकेटवर करवीर पोलिसांनी जोरदार कारवाई करत आणखी एका लॉजमालकाला अटक केली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ग्राहक बोलावून लॉजमध्ये कुंटणखाना चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईमुळे अवैध वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध वेश्याव्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार करवीर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
११ जुलै रोजी वाशी गावच्या हद्दीतील सनराईज लॉजिंगवर छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या महिलेची पोलिसांनी सुटका केली होती. याप्रकरणी लॉजवरील कामगार व एजंटांसह तीन आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपासादरम्यान आरोपी शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील याने पीडित महिलेला कोल्हापुरात आणून कणेरीवाडी येथील स्वयंभू लॉजमध्ये ठेवले असल्याचे समोर आले. याठिकाणी लॉजमालकासोबत संगनमत करून व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ग्राहक बोलावून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी स्वयंभू लॉजचा मालक अमोल श्रीपती खोत (वय ४०, रा. कणेरीवाडी) याला करवीर पोलिसांनी २० जुलै रोजी अटक केली. न्यायालयाने त्याला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या सतर्क तपासामुळे रॅकेटचा पर्दाफाश!
गुप्त माहितीपासून सुरू झालेल्या कारवाईत पोलिसांनी केवळ छापा टाकून थांबता, तर तपासाची साखळी पुढे नेत रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचत लॉजमालकाला अटक केली. करवीर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार तसेच करवीर पोलिसांच्या पथकाने केली.

No comments: