आषाढी एकादशीच्या शुभपर्वावर पुसदमध्ये 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा'! बेवारस वृद्धाला मिळाले नवीन जीवनदान
आषाढी एकादशीच्या शुभपर्वावर पुसदमध्ये 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा'! बेवारस वृद्धाला मिळाले नवीन जीवनदान.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~'माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन'चे अध्यक्ष गजानन जाधव व सहकाऱ्यांचे कौतुकास्पद पुण्यकर्म; अगतिक वृद्धाची खुशाल भाऊ नागपुरे यांच्या स्वर्गीय मातोश्री सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रमात आर्णी येथील वृद्धाश्रमात रवानगी
पुसद:
आज आषाढी एकादशीनिमित्त सर्व भक्तजन व भाविक विठूरायाच्या चरणी लीन होऊन ईश्वर सेवेत मग्न आहेत. एकीकडे पांडुरंगाच्या नामाचा गजर सुरू असतानाच, दुसरीकडे पुसदच्या भूमीत 'माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन'चे अध्यक्ष श्री. गजानन जाधव यांनी ईश्वर सेवेसोबतच मानव सेवेमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देत "मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा" हा संदेश प्रत्यक्षात उतरवला आहे. एका वस्त्रहीन व असहाय्य बेवारस वृद्धाला आधार देऊन त्यांनी आज आषाढी एकादशीच्या पावन दिवशी त्याला नवीन जीवनदान देण्याचे महान पुण्यकर्म केले आहे.
पुसद परिसरातील वाशिम रोड, निंबी येथील मारोती मंदिराच्या जवळ मागील ३-४ दिवसांपासून एक अज्ञात वृद्ध व्यक्ती अंगावर कपडे नसलेल्या व अत्यंत बिकट, असहाय्य स्थितीत पडलेला होता. परिसरातील काही जागरूक नागरिकांनी याबाबत 'माणुसकीची भिंत' संस्थेचे अध्यक्ष श्री. गजानन जाधव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून माहिती दिली.
संस्थेची तत्परता आणि मदत
माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता श्री. गजानन जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता, तो वृद्ध त्या भागातील नसून पूर्णपणे बेवारस असल्याचे समजले. वृद्धाची गंभीर बिघडलेली प्रकृती आणि बिकट अवस्था पाहता, संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ त्यांना अंघोळ घालून वस्त्र व अन्न-पाणी देऊन त्यांची मायने विचारपूस केली.
त्या वृद्धाच्या आरोग्याची आणि सुरक्षेची योग्य देखभाल व्हावी या उद्देशाने श्री. गजानन जाधव व संस्थेच्या सदस्यांनी त्या वृद्धास 'स्व. मातोश्री सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रम, आर्णी' येथे सुरक्षितपणे दाखल करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण घटनेची रीतसर नोंद वसंत नगर पोलीस स्टेशन, पुसद येथे माहिती अर्जाद्वारे दाखल करण्यात आली आहे.
"ईश्वर सेवेसोबतच आजच्या पवित्र दिवशी एका असहाय्य जिवाला आधार देता आला, हेच आमच्या संस्थेचे खरे भाग्य आहे."
— श्री. गजानन जाधव (अध्यक्ष, माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन)
आषाढी एकादशीच्या दिवशी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे व संवेदनशीलतेचे पुसद शहर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

No comments: