Header Ads

सलूनच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरी; मिरज पोलिसांकडून चोरटा जेरबंद!

 सलूनच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरी; मिरज पोलिसांकडून चोरटा जेरबंद!टीव्ही, होम थिएटरसह ट्रिमर असा ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मिरज :-मिरज शहरातील स्टेशन रोड परिसरातील सलून दुकानाचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला मिरज शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. शब्बीर पिरबाबा फकीर (वय २४, रा. ख्वाजा बस्ती, मिरज) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेशन रोडवरील एपी बेकरीसमोर असलेल्या पी. के. जेन्ट्स पार्लर या सलून दुकानात १८ जुलै रोजी रात्री दीड ते सकाळी आठच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील पॅनासॉनिक कंपनीचा ३२ इंची एलईडी टीव्ही, होम थिएटर आणि दोन ट्रिमर मशीन असा मुद्देमाल चोरीस नेला होता.

या प्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत केंगार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शब्बीर फकीर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल आपल्या घरात लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून १० हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही, १ हजार रुपयांचे होम थिएटर आणि ५०० रुपयांची दोन ट्रिमर मशीन, असा एकूण ११ हजार ५०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण चौगले, पोलिस उपनिरीक्षक विनायक मसाळे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.

मिरज शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.