Header Ads

कोल्हापूर हादरलं! थ्री स्टार लॉजमध्ये सुरू होता गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; करवीर पोलिसांचा धडाकेबाज छापा, ७ जणांच्या रॅकेटचा पर्दाफाश

 कोल्हापूर हादरलं! थ्री स्टार लॉजमध्ये सुरू होता गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; करवीर पोलिसांचा धडाकेबाज छापा, ७ जणांच्या रॅकेटचा पर्दाफाश..

कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटवर करवीर पोलिसांनी मोठी कारवाई करत संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. कळंबा येथील थ्री स्टार लॉजमध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपासणी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात दोन महिला एजंटांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधारासह एकूण ७ आरोपी निष्पन्न झाले आहेत.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त माहिती मिळाली की, स्वप्निल केरबा पाटील हा एजंटांच्या माध्यमातून गर्भवती महिलांना थ्री स्टार लॉजमध्ये बोलावून बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करत आहे.

त्यानुसार पोलिसांनी लॉजवर छापा टाकला असता स्वप्निल पाटील हा तपासणी करून कारमधून निघताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र त्याने एका महिलेला रस्त्यात उतरवून भरधाव वेगाने पलायन केले. त्या महिलेकडून चौकशी केली असता, तिला मनिषा दिनकर कांबळे (रा. सावर्डे पाटण, ता. राधानगरी) हिने गर्भलिंग तपासणीसाठी आणल्याचे उघड झाले. त्याचवेळी आणखी दोन महिलांची तपासणी झाल्याचेही समोर आले. त्या महिलांना अश्विनी गजानन शिंदे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) हिने आणल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दोन्ही महिला एजंटांना ताब्यात घेतले असून पुढील तपासात किरण चव्हाण, संतोष कोळी तसेच बेकायदेशीर कामासाठी लॉज उपलब्ध करून देणारा थ्री स्टार लॉजचा मालक यांचाही सहभाग समोर आला आहे.

या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०७/२०२६ दाखल करण्यात आला असून बीएनएस, PCPNDT कायदा, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम तसेच महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही धडक कारवाई अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केली. अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.