कृष्णा दुथडी भरून वाहतेय... तरीही जत तहानलेला!
कृष्णा दुथडी भरून वाहतेय... तरीही जत तहानलेला!म्हैसाळचे पाणी तातडीने सोडा; अन्यथा रस्त्यावर उतरू – जय भीम क्रांती सेनेचा सरकारला इशारा
सांगली.
एका बाजूला कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे, तर दुसऱ्या बाजूला दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करत आहेत. ही विसंगती दूर करण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करून जत तालुक्याकडे पाणी सोडावे, अन्यथा शेतकरी आणि नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा जय भीम क्रांती सेनेचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजू कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राजू कदम म्हणाले की, सध्या वरच्या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीत मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र जत तालुक्यातील विहिरी, बोअरवेल आणि कृपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पावसानेही अपेक्षित साथ न दिल्याने शेतातील पिके करपू लागली असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे पीक वाळत असताना शासन मात्र हातावर हात धरून बसल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांनी शासन आणि जलसंपदा विभागावर टीका करत सांगितले की, "कृष्णा नदी भरून वाहत असताना जत तालुक्यातील जनता तहानलेली राहणे ही प्रशासनाच्या नियोजनातील मोठी त्रुटी आहे. उपलब्ध पाण्याचे समन्यायी नियोजन करून म्हैसाळ योजनेचे सर्व टप्पे पूर्ण क्षमतेने सुरू करावेत आणि जत तालुक्याला तातडीने पाणी द्यावे. अन्यथा जय भीम क्रांती सेना व्यापक आंदोलन छेडेल."
जय भीम क्रांती सेनेच्या प्रमुख मागण्या
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सर्व टप्पे तातडीने सुरू करावेत.
जत तालुक्यातील पाझर तलाव, साठवण तलाव आणि इतर जलसाठे तातडीने भरून काढावेत.
शेती, जनावरे आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने पाणी उपलब्ध करून द्यावे.
जत तालुक्यातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात.
"पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. जत तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही," असा ठाम इशारा देत जय भीम क्रांती सेनेने शासनाला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

No comments: