पुसदच्या 'माणुसकीची भिंत' संस्थेचा संवेदनशील उपक्रम; बेघर मनोरुग्ण महिलेला मिळाले सुरक्षित छत्र
पुसदच्या 'माणुसकीची भिंत' संस्थेचा संवेदनशील उपक्रम; बेघर मनोरुग्ण महिलेला मिळाले सुरक्षित छत्र.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आर्णी येथील 'मातोश्री सुशिलाबाई नागपुरे केंद्रात' केले दाखल; पोलीस प्रशासन व सहकाऱ्यांच्या तत्परतेने समाजापुढे ठेवला आदर्श
"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले..." या संतवचनाचा सार्थ प्रत्यय देत पुसद येथील 'माणुसकीची भिंत' या सामाजिक उपक्रमाने पुन्हा एकदा आपल्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवले आहे. रस्त्यावर असहाय्य अवस्थेत फिरणाऱ्या एका बेघर व मनोरुग्ण महिलेचे पुनर्वसन करत, तिला आर्णी येथील 'स्वर्गीय मातोश्री सुशिलाबाई नागपुरे वृद्धाश्रम व मनोरुग्ण केंद्रात' सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले आहे. गेल्या १० वर्षांपासून निराधारांना आधार देणाऱ्या या संस्थेच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुसदजवळील विठाळा येथील हनवंत बापू मंदिर परिसरात मागील काही दिवसांपासून एक मनोरुग्ण महिला वास्तव्यास होती. तिच्या कुटुंबीयांनी तिला सोडून दिल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. स्थानिक रहिवासी उमेश शंकर मेश्राम व इतर नागरिक तिला अन्न-पाणी देत होते; परंतु ती महिला रात्रीच्या वेळी अचानक कुठेही निघून जात असल्याने तिच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीची जाणीव होताच उमेश मेश्राम यांनी 'माणुसकीची भिंत'चे अध्यक्ष गजानन जाधव यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
माहिती मिळताच संस्थेच्या टीमने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन महिलेची विचारपूस केली. त्यानंतर आर्णी येथील मनोरुग्ण केंद्राचे प्रमुख खुशालभाऊ नागपुरे यांना महिलेचे छायाचित्र व माहिती पाठवण्यात आली. केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताच, पुसद शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व नंदू चौधरी नितेश भालेराव यांना रितसर माहिती देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यानंतर सर्व नियमांचे पालन करून सदर महिलेला आर्णी येथील केंद्रात सुरक्षितपणे दाखल करण्यात आले.
"सध्याचे वातावरण पाहता रस्त्यावर उघड्यावर राहणाऱ्या एका असहाय्य महिलेला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी पोहोचवू शकलो, याचे मनस्वी समाधान आहे."
— गजानन जाधव (अध्यक्ष, माणुसकीची भिंत, पुसद)
या संवेदनशील आणि मानवीय कार्यात 'माणुसकीची भिंत'चे अध्यक्ष गजानन जाधव, सचिव पंजाबराव ढेकळे, नंदूभाऊ चौधरी, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार साहेब,नितेश भालेराव, नगरसेवक विष्णू शिखरे, उमेश शंकर मेश्राम, अनंता चतुर, अरुण नागुळकर, जगदीश सोनुने धनंजय आघाम व रुग्ण मित्र शांतीसागर इंगोले प्रमोद ठाकूर यांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य केले.

No comments: