Header Ads

६ लाखांची सुपारी अन् जंगलात खून! अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; ८ आरोपी जेरबंद

 ६ लाखांची सुपारी अन् जंगलात खून! अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; ८ आरोपी जेरबंद यवतमाळ एलसीबीची थरारक कारवाई; हिंगोलीतील तरुणाची हत्या, सुपारी देणाऱ्यांसह मारेकऱ्यांचा पर्दाफाश.

~~~~~~~~~~~~~~~~~~~

पुसद | तालुका प्रतिनिधी.

 सिद्धार्थ कदम.

~~~~~~~~~~~~~~~~~~

खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सत्तरमाळ जंगल परिसरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचे गूढ अखेर उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळला यश आले आहे. अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी मृताची ओळख पटवत ६ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असून, तब्बल आठ आरोपींना निष्पन्न करून ताब्यात घेतले आहे.

सत्तरमाळ जंगल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या गळ्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते, तसेच डोक्यावर दगडाने प्रहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मृताची कोणतीही ओळख पटत नसल्याने तपास हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत तेथे आढळलेल्या देशी दारूच्या बाटलीचा बॅच क्रमांक, DREAM कंपनीची पाण्याची बाटली आणि EURO कंपनीच्या मुंगडाळीच्या रिकाम्या पाकिटाचा धागा पकडला.

या वस्तू कोणत्या भागात विकल्या जातात, याचा माग काढत पोलिसांनी वाशिम, हिंगोली आणि परिसरात तपासाची चक्रे फिरवली. अखेर मृताची ओळख मंगेश ऊर्फ काल्या अर्जुन मनवर (वय ३५), रा. सिद्धार्थनगर, हिंगोली अशी पटली.

🔥 तपासात समोर आला सुपारी हत्येचा धक्कादायक कट

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना या हत्येमागे ६ लाख रुपयांची सुपारी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ज्ञानेश्वर मोहनसिंग राठोड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हत्येचा संपूर्ण कट उघडकीस आला.

या प्रकरणात राहुल ऊर्फ महाराज मुकींदा लोखंडे, श्रावण तुकाराम भवाळ, सोमनाथ संगित हजारे, विशाल अर्जुन राठोड, अर्जुन अशोक शेळके, दीपक लक्ष्मण जाधव आणि शुक्रधन ऊर्फ सिद्धार्थ संतोष जाधव यांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या तपासानुसार अजय भालेराव, राधा भालेराव आणि बाबू शेख यांनी ज्ञानेश्वर राठोडच्या माध्यमातून मंगेश मनवर याच्या हत्येसाठी ६ लाख रुपयांची सुपारी देऊन कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

🚨 पुरावा नसतानाही पोलिसांचा चिकाटीने तपास

घटनास्थळी ठोस पुरावा नसताना पोलिसांनी किरकोळ वाटणाऱ्या वस्तूंच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. पाण्याची बाटली आणि मुंगडाळीच्या पाकिटापासून सुरू झालेला तपास हिंगोलीपर्यंत पोहोचला आणि अखेर सुपारी हत्येचा संपूर्ण कट उघड झाला.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी खंडाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.