Header Ads

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सदिच्छा भेटीनंतर तरुणांची रांगणागड दुर्गभ्रमंती उत्साहात; शिवप्रेरणेचा जागर

 पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सदिच्छा भेटीनंतर तरुणांची रांगणागड दुर्गभ्रमंती उत्साहात; शिवप्रेरणेचा जागर

खोची | प्रतिनिधी

शिवदुर्ग ट्रेकर्स, खोची यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रांगणागड किल्ल्याचा अभ्यास दौरा व दुर्गभ्रमंती मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात पार पडला. इतिहास, संस्कृती आणि दुर्गसंवर्धनाची प्रेरणा तरुणांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दौऱ्याची सुरुवात खोची येथून झाली. मार्गात श्रीक्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांचे दर्शन घेतल्यानंतर सहभागी तरुणांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी तरुणांशी संवाद साधत सुरक्षिततेची काळजी घेण्याचा सल्ला दिला तसेच इतिहास आणि दुर्गसंवर्धनाशी निगडित अशा प्रेरणादायी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचे आवाहन केले.

रांगणागडावर पोहोचल्यानंतर श्री गणेश, श्री शंभू महादेव आणि श्री हनुमंत राय यांच्या मंदिरात दर्शन व आरती करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या रांगणागडाचा इतिहास, गडावरील ऐतिहासिक वास्तू, संरक्षण व्यवस्था आणि स्वराज्यकालीन घटनांचा अभ्यास करण्यात आला. यावेळी इतिहासाची माहिती जाणून घेताना सहभागी तरुण शिवकालीन वैभवाने भारावून गेले.

रिमझिम पावसात गर्द हिरवाईने नटलेल्या जंगलातून केलेली पदभ्रमंती सर्वांसाठी अविस्मरणीय ठरली. इतिहास, निसर्ग आणि शिवप्रेरणेचा अनोखा संगम अनुभवत सहभागी तरुणांनी दुर्गसंवर्धनाचा संदेश दिला. "जय भवानी... जय शिवाजी!" तसेच "छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांचा विजय असो!" या जयघोषांनी संपूर्ण रांगणागड परिसर दुमदुमून गेला.

या दुर्गभ्रमंतीत हातकणंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील यांच्यासह कुमार कुलकर्णी, शिवाजी बाबर, गजानन (बाबा) पाटील, बंडा पाटील, आशुतोष पाटील, महादेव पाटील, भागवत वाघ, राजवर्धन पाटील, रणजीत पाटील, अनिकेत पाटील, अभिमन्यू जगदाळे, निखिल बामणे, हर्ष जाधव आणि अनेक शिवप्रेमी तरुण सहभागी झाले होते.

या उपक्रमासाठी वाहतूक व्यवस्थेत संदीप जाधव परिवार तसेच संभाजी पाटील सरकार यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या योगदानाबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

इतिहासाची ओळख, दुर्गसंवर्धनाची जाणीव आणि शिवरायांच्या विचारांची प्रेरणा देणारा हा अभ्यास दौरा सर्व सहभागींसाठी कायम स्मरणात राहणारा ठरला.

No comments:

Powered by Blogger.