साताऱ्यात गुंडाचा ‘पिस्तूल प्लॅन’ पोलिसांनी उधळला!
साताऱ्यात गुंडाचा ‘पिस्तूल प्लॅन’ पोलिसांनी उधळला!
कमरेला गावठी कट्टा, खिशात तीन जिवंत काडतुसे; संगममाहुली ब्रिजवर डी.बी. पथकाचा थरारक सापळा.
सातारा | प्रतिनिधी अमर इंदलकरसातारा शहरात अवैध शस्त्रविक्रीचा डाव आखणाऱ्या पुणे जिल्ह्यातील सराईत गुंडाला सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अगदी ऐनवेळी जेरबंद करत त्याचा ‘पिस्तूल प्लॅन’ उधळून लावला. संगममाहुली ब्रिज परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरून पकडले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
आदेश पांडुरंग बिरामणे (वय ३०, रा. धनकवडी, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्यावर पुणे जिल्ह्यात सदोष मनुष्यवध, मारामारी, हाफ मर्डर आणि मोक्का यांसारखे सातहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांना बिरामणे हा संगममाहुली ब्रिज परिसरात अवैध पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने दोन पंचांसह परिसरात सापळा रचला.
रात्री बिरामणे संगममाहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना त्याला पोलिसांची चाहूल लागली. त्याने अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याचा पाठलाग करत चारही बाजूंनी घेराव घालून त्याला पकडले.
झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. शस्त्र बाळगण्यासाठी आवश्यक परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यात शस्त्रांचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी दिलेला हा थेट इशारा मानला जात आहे. दरम्यान, हे पिस्तूल कोणाकडून आणले, कोणाला विकण्यासाठी तो आला होता आणि या शस्त्रसाखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे व डी.बी. पथकातील पोलिसांनी केली.

No comments: