संत गोरा कुंभार वसाहत पाण्यापासून वंचित का? काळम्मावाडी धरणातून शहराला मुबलक पाणी; तरीही संत गोरा कुंभार वसाहतीत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा.
संत गोरा कुंभार वसाहत पाण्यापासून वंचित का?काळम्मावाडी धरणातून शहराला मुबलक पाणी; तरीही संत गोरा कुंभार वसाहतीत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा
कोल्हापूर :-काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा होत असताना, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणेशमूर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत गोरा कुंभार वसाहतीत मात्र आजही कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "संत गोरा कुंभार वसाहत पाण्यापासून वंचित का?" असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना या परिसरात हजारो गणेशभक्त, ग्राहक आणि व्यापाऱ्यांची वर्दळ सुरू झाली आहे. राज्याच्या विविध भागांतून भाविक आणि ग्राहक गणेशमूर्ती खरेदीसाठी येथे येत असले, तरी त्यांना पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराच्या मूलभूत नागरी सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संत गोरा कुंभार वसाहतीत एक दिवसाआड आणि अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेक घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही टंचाई असून, नागरिकांना खासगी टँकर किंवा पाण्याच्या कॅनवर अवलंबून राहावे लागत आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
गणेशमूर्ती तयार करणाऱ्या शेकडो कारागिरांचे कामही या पाणीटंचाईमुळे प्रभावित होत आहे. गणेशोत्सवाच्या हंगामात सर्वाधिक कामाचा काळ असतानाच पाण्याअभावी मूर्ती तयार करणे, रंगकाम आणि स्वच्छतेची कामे अडचणीत आली आहेत, अशी व्यथा कारागिरांनी मांडली.
नागरिकांच्या मते, कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रभाग क्रमांक ३ मधील लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
गणेशोत्सवापूर्वी संत गोरा कुंभार वसाहतीत दररोज, पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक, व्यापारी आणि गणेशमूर्ती कारागिरांनी केली आहे.
"काळम्मावाडी धरणाचे पाणी संपूर्ण शहराला मिळते, मग गणरायाच्या मूर्ती घडवणाऱ्या कुंभारांच्या वस्तीवरच अन्याय का? गणेशोत्सवाच्या तोंडावर तरी प्रशासनाने जागे होऊन हा प्रश्न तातडीने सोडवावा," अशी भावना संत गोरा कुंभार वसाहतीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments: