Header Ads

राधानगरी पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन; शांतता व सामाजिक सलोखा राखण्याच्या सूचना

 राधानगरी पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन; शांतता व सामाजिक सलोखा राखण्याच्या सूचना.

राशिवडे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी पोलीस ठाण्याच्या वतीने राशिवडे येथे गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीस सुमारे २०० ते २५० नागरिक उपस्थित होते.

यावेळी गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मंडळांनी आवश्यक परवानग्या घेणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेणे, सुरक्षित विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही व स्वयंसेवकांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

डीजे व ध्वनिक्षेपकांचा वापर नियमांच्या मर्यादेत करावा, आक्षेपार्ह कार्यक्रम अथवा सोशल मीडिया पोस्ट टाळाव्यात, जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये तसेच मंडप परिसरात दारू, जुगार व हुल्लडबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही सांगण्यात आले.

मिरवणुकीत महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासह प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेतच विसर्जन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस जि.प. सदस्य सागर धुंदरे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी तसेच राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती खोत व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवासाठी सुरक्षा व शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

No comments:

Powered by Blogger.