जोतिबा चैत्र यात्रेसाठी वाहतूक आराखडा तयार; अवजड वाहनांना ‘नो एंट्री’, मार्ग बदल अन् पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था!
जोतिबा चैत्र यात्रेसाठी वाहतूक आराखडा तयार; अवजड वाहनांना ‘नो एंट्री’, मार्ग बदल अन् पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था!
लाखो भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय; एकेरी मार्गांसह ‘नो पार्किंग’ झोन निश्चित.
कोल्हापूर | प्रतिनिधी.
रहिम पिजारी.
~~±~~~~~~~~~~~~~
श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथील ऐतिहासिक चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने वाहतुकीचे विशेष नियोजन केले आहे. लाखो भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक, प्रवेशबंदी आणि स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रेच्या मुख्य कालावधीत ट्रॅक्टर, ट्रक, तीनचाकी तसेच मालवाहू व अवजड वाहनांना कुशिरे, केर्ली, वाघबीळ आणि गिरोली मार्गे जोतिबा डोंगरावर जाण्यास बंदी राहणार आहे. ही वाहने बोरपाडळे फाटा–कोतोली–वाठार–एन.एच.४ मार्गे वळविण्यात येणार आहेत.
🚦 जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र मार्ग
कोल्हापूरहून जोतिबाकडे जाणाऱ्या बस व चारचाकी वाहनांसाठी केर्ली–गायमुख फाटा मार्गे गिरोली किंवा वाघबीळ मार्ग निश्चित करण्यात आला आहे. डोंगरावरून परतणारी वाहने दानेवाडी फाटा–वाघबीळ किंवा दानेवाडी–मालकोतोली–पन्हाळा मार्गे मार्गस्थ होतील.
🅿️ वाहनतळ कुठे?
दुचाकी: यमाई मंदिरामागील परिसर, एमटीडीसी परिसर आणि नवीन एस.टी. स्टँडसमोरील तोरणे कट्टा.
चारचाकी: यमाई मंदिराच्या दोन्ही बाजू, जुने एस.टी. स्टँडसमोरील मैदान, नवीन एस.टी. स्टँड परिसर आणि पिंजरा कट्टा.
अवजड वाहने: मेण पार्किंग आणि सेंट्रल प्लाझा परिसर.
⛔ ‘नो पार्किंग’ झोनमध्ये वाहन उभे केल्यास कारवाई
दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते नवीन एस.टी. बसस्थानक रोड, जुना एस.टी. स्टँड रोड, एमटीडीसी परिसर, सेंट्रल प्लाझा आणि यमाई मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना नो पार्किंग लागू करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
भाविकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गांचा आणि वाहनतळांचा वापर करून वाहतूक नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जोतिबा यात्रेला लाखोंची गर्दी; प्रशासनाची कसोटी!
भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी यंदा कडक वाहतूक नियोजन करण्यात आले असून, नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे.

No comments: