उंचगावात पोलीस चौकीची जोरदार मागणी; वाढत्या गुन्हेगारीवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक.
उंचगावात पोलीस चौकीची जोरदार मागणी; वाढत्या गुन्हेगारीवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक.
कोल्हापूर | प्रतिनिधी
उंचगाव, सरनोबतवाडी, मुडशिंगी आणि मणेर माळ परिसरात वाढत्या गुन्हेगारी, अमली पदार्थांची वाढती विक्री आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असल्याच्या पार्श्वभूमीवर उंचगाव येथे स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख व समन्वयक विक्रम चौगुले यांनी सांगितले की, उंचगावची लोकसंख्या ६० ते ७० हजारांच्या घरात असून हे करवीर तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक आहे. येथे मोठी बाजारपेठ, भाजी व मटण मार्केट असल्याने दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. मात्र गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांची विक्री वाढल्याने अनेक युवक व्यसनाधीन होत असून चोरी, मारामारी, लुटमार आणि खुनासारख्या गंभीर घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गांधीनगर पोलीस ठाणे या परिसरापासून दूर असल्यामुळे आपत्कालीन प्रसंगी पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे उंचगाव, सरनोबतवाडी, मुडशिंगी आणि मणेर माळ या परिसरासाठी स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याबरोबरच ती सुरू होईपर्यंत नियमित पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य विराग करी यांनी मणेर माळ परिसरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली.
निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी विक्रम चौगुले, विराग करी, महेश खांडेकर, अमोल पवार, अमर जाधव, अनिल माळी, गजानन येडूरकर, धनंजय पाटील, सागर पाटील, श्रीकांत पाटील, राम पाटील, दिनेश परमार, दत्ता फराकटे, सतीश रेडेकर, सुरेश चव्हाण, अथर्व सूर्यवंशी, गजानन मछले, प्रमोद शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments: