चिरमुरेच्या पोत्याआड लपवून गुटखा वाहतूक; एलसीबीची धडाकेबाज कारवाई.
चिरमुरेच्या पोत्याआड लपवून गुटखा वाहतूक; एलसीबीची धडाकेबाज कारवाई
नागठाणे येथे ट्रक अडवून २५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त; सांगलीतील एक आरोपी ताब्यात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस बंदी असलेल्या गुटख्याची चिरमुरेच्या पोत्यांच्या आड लपवून वाहतूक करणाऱ्या रॅकेटवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत तब्बल २५ लाख १५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नागठाणे (ता. सातारा) येथील राष्ट्रीय महामार्गावर पहाटे राबविण्यात आलेल्या या कारवाईत १७ लाख ६५ हजार ९४० रुपये किमतीचा ८९५.८ किलो विमल पानमसाला व तंबाखू तसेच ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला असून सांगली जिल्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गुटख्याची मोठी खेप सातारा मार्गे वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सोमवारी पहाटे नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ सापळा रचला.
यावेळी एमएच-१०/झेड-४६९६ क्रमांकाचा मालवाहू ट्रक संशयाच्या आधारे अडवून त्याची कसून तपासणी करण्यात आली. सुरुवातीला ट्रकमध्ये चिरमुरेची पोती असल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांनी पोती बाजूला करून तपासणी केली असता त्यांच्या आड मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला व तंबाखूचा साठा लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. चिरमुरेच्या पोत्यांचा आडोसा घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
घटनास्थळी अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली आप्पासाहेब खापणे यांनी भेट देऊन प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची पाहणी केली. त्यानंतर संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मछिंद्र आकाराम कांबळे (वय ५४, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २३४/२०२६ अन्वये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा नेमका कुठून आणला आणि तो कुठे पोहोचविण्यात येणार होता, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments: